- मोसीन शेख
मुंबई : इतके दिवस वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत असणाऱ्या भाजपने शनिवारी अजित पवारांच्या मदतीने सत्तास्थापन केल्याने राजकीय वर्तुळात भूकंपाचे हादरे बसले आहे. मात्र आता बहुमताचा आकडा सिद्ध करावा लागणार असल्याने भाजपकडून 'ऑपरेशन लोटस' मोहीम आखण्यात आली आहे. याची जवाबदारी इतर पक्षामधून भाजपमध्ये आलेल्या बड्या नेत्यांनाकडे देण्यात आली आहे. त्यामुळे बहुमताची जवाबदारी आता भाजपच्या अयारामांवर असल्याचे बोलले जात आहे.
महाविकासआघाडीकडे बहुमत असल्याने व सत्तास्थापनेचा दावा करणार असताना, भाजपने अजित पवारांशी हातमिळवणी करत सत्तास्थापन केली. एका रात्रीत भाजपने शपथविधी उरकल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसने शपथविधीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
तर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक जिंकण्यासाठी आणि सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपकडून फोडाफाडीचे राजकरण केल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत इतर पक्षामधून भाजपमध्ये आलेल्या बड्या नेत्यांना ‘ऑपरेशन लोटस’ची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, बबनराव पाचपुते, विजयकुमार गावित यांचा समावेश आहे.
भाजपकडे सध्या 105 आमदार आहेत तर 15 अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्यानं भाजपनं 120 आमदार आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. तर इतर पक्षांमधील आमदारांना फोडून सरकार स्थापन करणार नाही, अशी भूमिका फडणवीस यांनी सुरुवातीला मांडली होती. मात्र, नंतर घडलेल्या प्रचंड घडामोडींमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपच्या गळाला लागले आणि थेट उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे आता भाजपचे संख्याबळ वाढविण्यासाठी ऑपरेशन लोटस हाती घेण्यात येणार आहे.