Maharashtra Government: अजित पवारांची पक्षातून हकालपट्टी करणार का?; शरद पवार म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 10:22 AM2019-11-25T10:22:12+5:302019-11-25T10:34:44+5:30
शरद पवारांनी स्पष्ट केली राष्ट्रवादीची भूमिका
सातारा: महाविकासआघाडीकडून सत्ता स्थापनेची तयारी सुरू असताना राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी भाजपासोबत जात थेट उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. यावर आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केलं. हकालपट्टीचा निर्णय पक्षाकडून घेतला जात असतो. हा निर्णय एक व्यक्ती घेत नाही, असं शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं.
एखाद्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी करायची का, याचा निर्णय एक व्यक्ती घेत नाही. याबद्दलचा निर्णय पक्ष घेईल. अजित पवार आज उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. मात्र त्यांची निवड वैध आहे का प्रश्न आहे. कारण बहुमत नसतानाही भाजपानं सरकार स्थापन केलं आहे, असा तांत्रिक मुद्दा शरद पवारांनी उपस्थित केला. अजित पवार भाजपासोबत गेले आहेत. तो त्यांचा निर्णय आहे. पक्ष त्यांच्या सोबत नाही, या भूमिकेचादेखील त्यांनी पुनरुच्चार केला. अजित पवारांच्या बंडामागे माझा हात नाही, हेदेखील त्यांनी स्पष्ट केलं.
राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ३५ व्या स्मृतिदिनानिमित्त शरद पवार त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शरद पवार कराडमधल्या प्रीतीसंगमावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यपाल आणि राष्ट्रपती पदांच्या गैरवापरावरुन भाजपाला लक्ष्य केलं. सर्व संकेतांना हरताळ फासण्याचं काम राज्यपालांकडून सुरू आहे. केंद्र सरकारकडून मनमानी कारभार चालला आहे, असं शरद पवार म्हणाले.