मुंबई: राज्यात सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. मुख्यमंत्रिपदाची मागणी पूर्ण न झाल्यानं शिवसेनेनं भाजपापासून फारकत घेत थेट काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापनेची तयारी सुरू केली. या तीन बैठकांमध्ये बैठकांचं सत्र सुरू झालं. त्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालं. मात्र शनिवारी सकाळी अचानक अजित पवार यांनी भाजपासोबत जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे मोठा राजकीय भूकंप झाला. यानंतर राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपाला ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली. त्यामुळे येत्या काळात राज्यात अतिशय रंजक घडामोडी पाहायला होऊ शकतात. राज्यात नेमकं काय होऊ शकतं, जाणून घ्या शक्यता१) अजित पवार यांचे बंड यशस्वी झालं, तरी संख्या पुरेशी होण्यासाठी आणखी तडजोडी लागणार. २) अजित पवारांचे बंड यशस्वी होण्याची शक्यता अतिशय कमी आहे. कारण दोन तृतीयांश आमदार अजित पवारांसोबत जाण्याची शक्यता धूसर झाली आहे. अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थित असलेले १३ पैकी १२ आमदार परतले आहेत.३) फडणवीस हे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याप्रमाणे राजीनामा देतील. मात्र राजीनामा देताना विधानसभा बरखास्तीची शिफारस करतील किंवा फडणवीसांच्या राजीनाम्यानंतर राज्यपाल अशी शिफारस राष्ट्रपतींकडे करतील.४) पुन्हा राष्ट्रपती राजवट आणि ती वर्षभर चालेल. यानंतर निवडणूक होईल.५) वर्षभराच्या कालावधीत अजित पवार आणि धनंजय मुंडे यांना राजकीय बळ देण्याचा भाजपाचा प्रयत्न राहील. अजित पवारांना राज्यसभेवर घेतलं जाऊ शकतं. हे दोन नेते भाजपच्या गळाला लागल्यास मराठा व ओबीसींमध्ये भाजपाचा शिरकाव होईल. राष्ट्रवादीची राजकीय स्पेस काँग्रेसकडे जाऊ न देण्याची खटपट भाजपा करेल.६) शरद पवार मवाळ होणार नसतील तर शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी निवडणूक हाच पर्याय भाजपासमोर आहे.७) अजित पवार व धनंजय मुंडे एकतर सत्तेत किंवा सत्तेबाहेर राहून भाजपाबरोबर राहिले तर पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात भाजपाला ताकद मिळेल. आज याच भागात भाजपा कमजोर आहे. इतरत्र भाजपाची कामगिरी चांगली झाली आहे.८) महाराष्ट्रात विरोधकांचं सरकार आल्यास शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना ताकद मिळेल. असं झाल्यास पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहांसाठी ती मोठी नामुष्की असेल. त्यामुळे असं होऊ यासाठी दोन्ही नेते संपूर्ण ताकद पणाला लावतील.
Maharashtra Government: सत्तासंघर्ष शिगेला; राज्यात नेमकं काय घडणार? जाणून घ्या शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 9:32 AM