मुंबई - राज्यातील राजकीय घडामोडींवर देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. देशातील मोठे नेते भाजपा-राष्ट्रवादीच्या आघाडीवरुन अजित पवार आणि भाजपाला लक्ष्य करत आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर 'अनाकलनीय' अशी एकशब्द प्रतिक्रिया देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या शांत आहेत. राज यांनी राज्यातील राजकीय नाट्यावर एक शब्दही उच्चारला नाही. मात्र, राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये राज यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली आहे.
राजकारणातील नव्या निर्णयानंतर संबंधित नेत्याचे जुने व्हिडिओ किंवा ट्विट पुन्हा नव्याने चर्चेत आणण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर सुरू असतो. त्यामुळे पक्षबदलू किंवा शब्दफिरवू नेत्यांची चांगलीच गोची झाल्याचं पाहायलं मिळत आहे. अजित पवार यांनी आपल्या काकांची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केलंय. अजित पवार यांनी शरद पवारांच्या सहमतीशिवाय उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलीय. या शपथविधीनंतर राज्यात राजकीय भुकंप पाहायला मिळाला. त्यानंतर, शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांशी संपर्क करुन त्यांची बैठक बोलावली. या बैठकीला 43 आमदार उपस्थित होते. त्यामुळे आता बहुमत चाचणीची प्रतिक्षा सर्वांनाच लागली आहे. मात्र, अजित पवारांचे बंड अनेकांना पटले नसून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या समर्थकांकडून राज ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ शेअर करण्यात येत आहे.
राज ठाकरेंनी सोलापूर येथील सभेत अजित पवारांवर जबरी टीका केली होती. अजित पवारांच्या टीकेला उत्तर देताना राज यांनी, सकाळी लवकर उठून तुम्ही काय करता? असा प्रश्न विचारला होता. तसेच, 50-52 वर्षाचे झाले तर काकाच्या जीवावरच जगतात, किती दिवस जगणार असे राज यांनी म्हटले होते. त्याच भाषणात, काकांनी हात काढला तर पानपट्टीवालाही विचारणार नाही, अशी टीकाही राज यांनी अजित पवारांवर केली होती. आताच्या राजकीय परिस्थिला तो व्हिडिओ अनुचित ठरवुन अनेकांकडून तो व्हिडिओ शेअर करण्यात येत आहे.
पाहा व्हिडिओ -