बेळगाव : भाजप सोडून भिन्न विचारधारा असणारे पक्ष सत्ता स्थापनेसाठी एकत्र आले आहेत. त्यांचा किमान समान कार्यक्रम ठरला आहे. किमान समान कार्यक्रमात शेतकरी, ग्रामीण युवकांना रोजगार, कर्जमाफी संबंधी ठोस भूमिका असेल तर महाआघाडीचा निर्णय घेणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.गेल्या वर्षभरात सरकारने साखरेच्या निर्यातीसाठी प्रोत्साहन दिले, पण सबसिडीची रक्कम सरकारने साखर कारखान्यांना दिली नाही. त्यामुळे दुसरीकडून पैसे घेऊन कारखान्याला व्याज भरावे लागते. म्हणून साखर कारखाने अडचणीत येत आहेत. निर्यातीला सबसिडी द्यायची, कच्ची साखर आयात करायची असे केंद्र सरकारचे मागच्या वर्षाचे धोरण होते. केंद्र सरकारच्या धोरणात सुसूत्रता नसल्यामुळे साखर उद्योगावर परिणाम झाला, अशी टीकाही राजू शेट्टी यांनी केली. भाजपने राष्ट्रपतिपदाची ऑफर जरी शरद पवार यांना दिली तरी पवार भाजपसोबत जाणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.जयसिंगपूर येथे २३ नोव्हेंबर रोजी १८ वी राष्ट्रीय ऊस परिषद आयोजित करण्यात आली आहे. या ऊस परिषदेत साखर दर व एफआरपीबाबत चर्चा होणार आहे. बेळगावसह सीमाभागातून शेतकऱ्यांनी या परिषदेत सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
Maharashtra Government: महाशिवआघाडीबद्दल राजू शेट्टी म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 2:35 AM