मुंबई : मुख्यमंत्री पद मिळणार नसेल तर काँग्रेसने सेना आणि राष्ट्रवादीच्या नव्या आघाडीला पाठिंबा देऊ नये, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत शिवसेना आणि भाजपने एकत्र यावे यासाठी आठवले स्वत:च मध्यस्थीसाठी पुढाकार घेत विविध फॉर्म्युले देत होते. सेनेने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर आता त्यांनी काँग्रेसकडे मोर्चा वळविला आहे.शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे नव्या आघाडीचे सरकार स्थापन होत असताना मुख्यमंत्री पद शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाटून घेतले जाणार असल्याची चर्चा आहे. तर, काँग्रेसला उपमुख्यमंत्री पद दिले जाणार आहे. त्यामुळे नव्या आघाडीला पाठिंबा देताना काँग्रेसने विचार करावा, असा सल्ला आठवले यांनी दिला. या वेळी नव्या आघाडीचा फॉर्म्युलाही त्यांनी सुचविला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या आघाडीत शिवसेनेला दोन वर्षे मुख्यमंत्री पद द्यावे. उरलेल्या तीन वर्षांपैकी दीड वर्ष राष्ट्रवादी आणि दीड वर्ष काँग्रेसने घ्यावे. त्यासाठी काँग्रेसने आग्रही राहावे.काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे. अनेक अडचणींचा सामना करीत त्यांनी सेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा करण्यास मागे हटू नये; मुख्यमंत्रिपद मिळणार नसेल तर नव्या आघाडीला काँग्रेसने पाठिंबा देऊ नये, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.
Maharashtra Government: रामदास आठवलेंचा सूर अचानक बदलला; मुख्यमंत्रिपदासाठी सुचवला नवा फॉर्म्युला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 3:50 AM