मुंबई: राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांची समजूत काढण्यात पक्षाला पुन्हा एकदा अपयश आलं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवारांची भेट घेतली. मात्र त्यांची मनधरणी करण्यात दोन्ही नेते अपयशी ठरले. उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अडचणी वाढल्या आहेत. काल सकाळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हापासून राष्ट्रवादीकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप यामध्ये राष्ट्रवादीला यश आलेलं नाही. शरद पवारांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि अजित पवारांचे अनेक वर्षांचे विश्वासू सहकारी दिलीप वळसे पाटील यांना अजित पवारांची समजूत काढण्यासाठी पाठवलं होतं. मात्र दीड तासाच्या चर्चेनंतरही अजित पवारांची मनधरणी करण्यात पाटील यांना अपयश आलं. तत्पूर्वी काल राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनीही अजित पवारांची भेट घेतली. तटकरेंनी अजित पवारांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी रिकाम्या हातानं परतावं लागलं. तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना स्वगृही परतण्यासाठी भावनिक साद घातली आहे. याशिवाय आमदार रोहित पवार यांनीदेखील फेसबुक पोस्टच्या माध्यमातून अजित पवार यांनी माघारी परतण्याचं आवाहन केलं आहे. लवकरच महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येईल. पण यात हक्काची माणसं दुरावू नयेत, अशा शब्दांमध्ये रोहित पवार यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Maharashtra Government : अजित पवारांची मनधरणी करण्यात पुन्हा अपयश; राष्ट्रवादीचे नेते माघारी परतले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 2:33 PM