Maharashtra Government: ...तर आम्ही नवीन आमदार ते काही चालवून घेणार नाही, रोहित पवारांचा भाजपाला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 04:44 PM2019-11-30T16:44:48+5:302019-11-30T16:46:09+5:30
भाजपा हा गोंधळ घालण्यासाठी अतिशय योग्य असा पक्ष आहे. कदाचित त्यांना गोंधळ कसा घालावा हे चांगल्या पद्धतीनं माहिती आहे, असं मला वाटतं.
मुंबईः भाजपा हा गोंधळ घालण्यासाठी अतिशय योग्य असा पक्ष आहे. कदाचित त्यांना गोंधळ कसा घालावा हे चांगल्या पद्धतीनं माहिती आहे, असं मला वाटतं. गेल्या पाच वर्षांत ते कसं सरकार चालवत होते हे आपण पाहिलंच आहे. यापुढे भाजपाला नुसताच गोंधळ घालायचा असेल आणि वाद करायचा असेल तर आम्ही नवीन आमदार ते काही चालवून घेणार नाही. त्या ठिकाणी योग्य प्रकारे उत्तर देऊ, असं नवनिर्वाचित आमदार रोहित पवार म्हणाले आहेत. महाविकास आघाडी सरकारनं बहुमत सिद्ध केल्यानंतर एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी त्यांनी बातचीत केली आहे, त्यावेळी ते बोलत होते.
गोंधळ त्यांनी घातला पण काय शिकायचं आणि काय नाही शिकायचं हे आपल्यावर असतं. तिथं भाजपा किंवा त्यांचे जे काही सहकारी असतील, त्यांनी पाच वर्षं आर्थिक दृष्टिकोनातून गोंधळ घातला. कामकाज ते चांगल्या पद्धतीनं चालवू शकले नाहीत, लोकांनीच त्यांना बाहेर काढलं. आता स्वतःहून पुढे येऊन नवीन मुख्यमंत्र्यांचं स्वागत न करता, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा मान न ठेवता त्या ठिकाणी गोंधळ घालायला सुरुवात केली आहे. कदाचित त्यांना हे दाखवायचं होतं की त्यांना किती आकडे कळतात. त्यांना किती कायदा कळतो. पण आम्ही 169 मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्याचा अर्थ सर्वाधिक लोक हे महाविकास आघाडीकडे होते.
असं असतानाही प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी शांत होता. त्या ठिकाणी शांततेत सर्व प्रक्रिया पार पाडली. विधानसभेचा मान ठेवणं ही प्रत्येक आमदाराची जबाबदारी आहे. उगाच कोणताही मुद्दा घेऊन कोणी गडबड करण्याचा प्रयत्न करत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू, आम्ही लोकांच्या सेवेसाठी कटिबद्ध राहणार आहोत. मुद्दा बाजूला ठेवून उगाच काही तरी बोलायचं ते काही योग्य नाही. भाजपा आमदारांना खुणवून गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत होते. परंतु असा प्रकार त्यांनी यापुढेही चालू ठेवल्यास आम्ही त्यांना योग्य उत्तर देऊ, असंही रोहित पवार म्हणाले आहेत.