मुंबई : भाजपसोबत युती तोडून शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठींब्याने सत्तास्थापनेचा प्रयत्न करत असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र बहुमत सिद्ध करण्याच्या एक दिवस आधीच अजित पवारांनी राजीनामा देऊन,घरवापसी केली. तर अजित दादांनी ही चूक स्वीकारली असून, शरद पवारांनी सुद्धा त्यांना माफ केलं असल्याचे नवाब मलीक म्हणाले आहे.
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सरकार स्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत असतानाच भाजपानं राजकीय चमत्कारच घडवला. शनिवारी सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा करत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर अजित पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या पाठिंब्याच पत्र देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.
मात्र बहुमत सिद्ध करण्यापूर्वीचं अजित पवारांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन घरवापसी केली. त्यामुळे त्यांनी केलेल्या बंडखोरीबद्दल पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई होणार का ? अशी चर्चा पाहायला मिळत होती. यावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलीक म्हणाले की, अजित पवारांनी आपली चूक स्वीकारली असून त्यांची घर वापसी झाली आहे. तर शरद पवारांनी सुद्धा त्यांना माफ केलं असल्याचे मलीक म्हणाले. तर 'सुबह का भूला शाम को घर आ जाये तो, उसे भुला नही कहते' असे सुद्धा मलिक म्हणाले.
तसेच पुढे बोलताना त्यांनी भाजपचा सुद्धा समाचार घेतला. भाजप हा कधीच मोठा पक्ष नव्हता. त्यांना सत्तेची सूज आली होती. मात्र आता सत्ता गेल्याने ही सूज हळूहळू नक्कीच कमी होईल असा,खोचक टोला त्यांनी भाजपला लगावला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी मलीक बोलत होते.