मुंबई : महाराष्ट्रात शिवसेनेसोबत सत्तास्थापनेचे वेध लागलेले असताना भाजपाने थेट राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनाच सोबत घेत सत्ता स्थापन केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून अजित पवार यानी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना शरद पवारांना याबाबतची कल्पना होती का, याबाबत स्पष्टपणे सांगितले नाही. यामुळे शरद पवारांना अंधारात ठेवून अजितदादांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा होती.
याबाबतचा खुलासा एनआयने केला आहे. एनआयला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेते असले तरीही अध्यक्ष शरद पवार यांच्या संमती शिवाय पक्ष कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत. तसेच शरद पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्रातील नव्या सरकार स्थापनेच्या चर्चेमध्ये थेट सहभागी होते. त्यांनीच अजित पवारांना सूचना केल्याचे म्हटले आहे.
तर अजित पवार यांच्या निर्णयाला शरद पवारांचा विरोध असल्याचे वृत्त राष्ट्रवादीच्या गोटातून येत आहे. शरद पवार आमदारांना फोन करत असून आपल्याला तात़डीने भेटण्यासाठी बोलावत आहेत. तर दुसरीकडे शरद पवारांनी अजित पवारांच्या भूमिकेचं समर्थन केलं असंही सांगितलं जात आहे. यामुळे राज्यातील घडामोडी पाहता, या राजकीय भूकंपामागे आहे तरी कोण असा प्रश्न पडला आहे.
शरद पवार अनभिज्ञ? शरद पवार साहेबांना सुरुवातीच्या काळात या गोष्टी माहित्या होत्या. परंतू नंतरच्या काळामध्ये; पहिल्या काळात त्यांना मी स्थिर सरकार देण्याबाबत सांगत होतो. कोणीतरी दोघांनी किंवा तिघांनी एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकणार नव्हते. या आधीही काँग्रेस, राष्ट्रवादीने स्थिर सरकार दिले आहे. शिवसेना-भाजपाने स्थिर सरकार दिले आहे, असे अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर सांगितले.
रातोरात सोंगट्या बदलल्या कशा?काल रात्री काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बैठक फिस्कटली होती. यानंतर मध्यरात्री साडेबारा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघे राज्यपालांना भेटले. एक वाजता राज्यपालांनी केंद्राकडे शिफारस केली. राष्ट्रपती राजवट हटवण्याची सकाळी सातची शपथविधीची वेळ ठरली. काँग्रेस शिवसेनेला बाजूला ठेवून भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले. यात प्रफुल्ल पटेल यांनी मोठी भुमिका बजावली आहे.