कराड - शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा निर्णय घेतला आहे. राज्याचा प्रत्यक्ष जेव्हा निर्णय घेण्याचा विचार होतो त्यावेळेस सर्व गोष्टी पाहाव्या लागतात. मात्र आमच्या पक्षातील अजित पवार यांनी जो बंड करीत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. त्यांना बडतर्फ करायचे की अन्य कारवाई याचा निर्णय पक्षातील सर्वजण घेतील. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीची शपथ घेतली म्हणून काही होत नाही. अजून सत्ता स्थापन करून बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. ते 30 तारखेला समजेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
कराड येथील वेणूताई चव्हाण सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, सारंग पाटील, सौरव पाटील उपस्थित होते. भाजपाने सत्तास्थापनेच्या हालचाली केल्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तरीही त्यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. ते त्यांना करता येणार नाही. तर कोणत्याही परिस्थितीत शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेसचेच सरकार अस्तित्वात येईल असा ठाम विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे.
महाविकासआघाडीकडून सत्ता स्थापनेची तयारी सुरू असताना राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी भाजपासोबत जात थेट उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. यावर आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केलं. हकालपट्टीचा निर्णय पक्षाकडून घेतला जात असतो. हा निर्णय एक व्यक्ती घेत नाही, असं शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं.
एखाद्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी करायची का, याचा निर्णय एक व्यक्ती घेत नाही. याबद्दलचा निर्णय पक्ष घेईल. अजित पवार आज उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. मात्र त्यांची निवड वैध आहे का प्रश्न आहे. कारण बहुमत नसतानाही भाजपानं सरकार स्थापन केलं आहे, असा तांत्रिक मुद्दा शरद पवारांनी उपस्थित केला. अजित पवार भाजपासोबत गेले आहेत. तो त्यांचा निर्णय आहे. पक्ष त्यांच्या सोबत नाही, या भूमिकेचादेखील त्यांनी पुनरुच्चार केला. अजित पवारांच्या बंडामागे माझा हात नाही, हेदेखील त्यांनी स्पष्ट केलं.
राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या 35व्या स्मृतिदिनानिमित्त शरद पवार त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यपाल आणि राष्ट्रपती पदांच्या गैरवापरावरुन भाजपाला लक्ष्य केलं. सर्व संकेतांना हरताळ फासण्याचं काम राज्यपालांकडून सुरू आहे. केंद्र सरकारकडून मनमानी कारभार चालला आहे, असं शरद पवार म्हणाले.