Maharashtra Government: 'बहुमत होतं तर ऑपरेशन लोटससाठी चांडाळ चौकडीची नियुक्ती का केली?'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 07:38 AM2019-11-26T07:38:38+5:302019-11-26T07:40:37+5:30
शिवसेनेकडून भाजपा, अजित पवारांचा खरपूस समाचार
मुंबई: फडणवीस यांच्याकडे बहुमत होतं तर मग बहुमताचा आकडा गाठण्यासाठी नव्या चांडाळ चौकडीची नियुक्ती 'ऑपरेशन लोटस'च्या नावे का केली?, असा सवाल सामनामधून शिवसेनेनं उपस्थित केला आहे. नितीन गडकरींनी क्रिकेटच्या खेळाची झालं तरी 'सत्यमेव जयते' या ब्रीदाचा पराभव जुगाऱ्यांना करता येणार नाही, अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपाला ठणकावलं आहे. राज्यातील जनतेनं काळजी करू नये, असं आवाहनदेखील शिवसेनेनं केलं आहे.
महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि प्रतिष्ठेचा बाजार सत्तांधांनी मांडला आहे. महाराष्ट्राशी ज्यांचं भावनिक नातं अजिबात नाही असेच लोक शिवरायांच्या महाराष्ट्राच्या इज्जतीची अशी लक्तरं काढू शकतात. महाराष्ट्राच्या जडणघडणीत, महाराष्ट्राच्या निर्मितीत या मंडळींनी रक्ताचा सोडाच, पण घामाचा एक थेंबही गाळला नसल्यानं हा राजकीय घोटाळा त्यांनी केला आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तीन पक्षांनी मिळून १६२ आमदारांचं पत्र राजभवनात आता सादर केलं. हे सर्व आमदार राजभवनात राज्यपालांसमोर उभे राहायला तयार आहेत. इतकं स्पष्ट चित्र असताना राज्यपालांनी कोणत्या बहुमताच्या आधारावर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली?, असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे.
राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांचादेखील शिवसेनेनं खरपूस समाचार घेतला आहे. अजित पवार यांचा सर्व खेळ संपला तेव्हा 'शरद पवार हेच आमचे नेते व मीच राष्ट्रवादीचा पाईक' अशी बतावणी त्यांनी केली. ही पराभूताची मानसिकता आहे. शरद पवार यांचे पुतणे म्हणून तुम्ही स्वत:ला मिरवत असाल तर आधी बारामतीच्या आमदारकीचा, पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देऊन तुम्ही स्वतंत्र राजकारण करायला हवं होतं. पण काकांनी जे कमावलं तेच चोरून 'मीच नेता, माझाच पक्ष' असं सांगणं हा वेडेपणाचा कळस आहे, अशी घणाघाती टीका शिवसेनेनं केली आहे.