मुंबई : गेल्या २४ एप्रिलला विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. मात्र सुमारे तीन आठवड्यांपर्यंत लांबलेला राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा लवकरच सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्यात शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या आघाडीची सत्तेची बोलणी अंतिम टप्प्यात असून त्यांचे सरकार लवकरच सत्तेवर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेनेचे विजयी आमदार व शिवसेनेला पाठिंबा देणारे ७ अपक्ष आमदार किमान ४ ते ५ दिवस जयपूरला जाण्याची शक्यता आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोणताही दगाफटका होऊ नये याची काळजी घेतली आहे. सेनेच्या विजयी आमदारांना २२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता मातोश्री येथे बोलावले आहे. आमदारांची बैठक झाल्यानंतर शिवसेनेचे विजयी आमदार व शिवसेनेला पाठिंबा देणारे ७ अपक्ष आमदार किमान ४ ते ५ दिवस जयपूरला जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेच्या आमदारांना ४-५ दिवसांचे कपडे, ओळखपत्र म्हणून पॅन कार्ड व आधार कार्ड घेऊन येण्याचे आदेश ‘मातोश्री’कडून देण्यात आले आहेत. अलीकडेच काँग्रेसच्या ४४ विजयी आमदारांना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी सावध पवित्रा म्हणून जयपूरला ठेवले होते. त्यात राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. तर गोवा येथे भाजप सरकार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गोव्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना ठेवण्यासाठी जयपूरची निवड केल्याचे समजते.
Maharashtra Government: शिवसेनेच्या आमदारांचे वऱ्हाड चालले जयपूरला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 3:47 AM