Maharashtra Government : तिढा सुटला, फॉर्म्युला ठरला; 'असं' होणार मंत्रिपदांचं वाटप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 06:56 AM2019-11-23T06:56:57+5:302019-11-23T06:57:28+5:30
महाविकास आघाडीकडून आज सत्ता स्थापनेचा दावा केला जाण्याची शक्यता
मुंबई : राज्यातील राजकीय अस्थिरता संपुष्टात येऊन महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेची घटिका समीप आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, हे स्पष्ट झाले आहे. याशिवाय मंत्रिपदांच्या वाटपाचा तिढादेखील सुटला आहे.
शिवसेना नेत्यांच्या शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आपण मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास तयार आहोत, असे सांगितले. त्यानंतर सर्व सेना नेत्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले, असे खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.
तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत उद्धव यांनी मुख्यमंत्री व्हावे, असा आग्रह राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व काँग्रेस नेत्यांनी धरला होता. मात्र, उद्धव यांनी तेव्हा त्यास अद्याप होकार दिला नव्हता. बैठकीनंतर शिवसेना नेत्यांची स्वतंत्र बैठक झाली. तिथे सेनेच्या नेत्यांनीही उद्धव यांना आपणच मुख्यमंत्री व्हा, असा जोरदार आग्रह केला. तो उद्धव यांनी मान्य केला, असे खा. राऊत म्हणाले.
15-15-12 चा फॉर्म्युला
फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेकडे पाच वर्षे मुख्यमंत्रीपद तसेच 10 कॅबिनेट व पाच राज्यमंत्रिपदे असतील. राष्ट्रवादीकडे 11 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रीपदे तर काँग्रेसकडे 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपदे असतील. याशिवाय विधानसभाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतर्फे यासाठी दिलीप वळसे-पाटील तर काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव चर्चेत आहे. अस्थिर राजकीय वातावरणात विधानसभाध्यक्षांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. त्यामुळेच हे पद आपल्याकडे राखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते अतिशय आग्रही आहेत.