मुंबई: राज्याला सध्या सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. सत्ताधाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी विधिमंडळात चांगला विरोधी पक्ष असायला हवा, असं आवाहन करत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभा निवडणूक लढवली. भाजपाला रोखण्यासाठी, त्यांच्यावर अंकुश ठेवण्याच्या दृष्टीनं राज ठाकरेंनी मतदारांना आवाहन केलं होतं. मात्र राज ठाकरेंचा केवळ एक उमेदवार निवडणुकीत विजयी झाला. परंतु राज ठाकरेंनी पाहिलेलं प्रबळ विरोधी पक्षाचं स्वप्न पूर्ण होणार आहे. राष्ट्रवादी, काँग्रेसनं शिवसेनेला पाठिंबा दिल्यानं राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं एका दिवसात बहुमत सिद्ध करण्याचा दिलेला आदेश, अजित पवारांचं फसलेलं बंड यामुळे काल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता भाजपाला विरोधी पक्षात बसावं लागणार आहे. विशेष म्हणजे निवडणुकीत पहिला क्रमांकाचा पक्ष ठरुनही भाजपावर विरोधी बाकांवर बसण्याची नामुष्की ओढवली आहे. तर राज्यातील दुसरा, तिसरा आणि चौथा क्रमांकाचा पक्ष सत्तेत जाणार आहे. मात्र त्यांच्यासमोर तब्बल १०५ आमदारांसह विरोधी पक्षात असलेल्या भाजपाचं आव्हान असेल. नव्या विधानसभेत शिवसेनेचे ५६ आमदार आहेत. तर राष्ट्रवादीचे ५४, काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. या आमदारांची एकूण संख्या पाहिल्यास ती १५४ वर जाते. याशिवाय शिवसेनेला काही अपक्ष आमदारांचादेखील पाठिंबा आहे. काही दिवसांपूर्वीच हॉटेल ग्रँड हयातमध्ये महाविकासआघाडीनं १६२ आमदारांना एकनिष्ठतेची शपथ घेत शक्तिप्रदर्शन केलं. महाविकासआघाडीला विधानसभेत १०५ आमदार असलेल्या भाजपाला तोंड द्यावं लागेल. त्यामुळे तीन प्रमुख पक्षांचं आघाडी सरकार विरुद्ध भाजपा असा सामना विधानसभेत पाहायला मिळू शकतो. राज ठाकरेंनी निवडणूक प्रचारात राज्याला सक्षम विरोधी पक्षाची गरज असल्याचं म्हटलं होतं. राज ठाकरेंचं हे स्वप्न आता साकार होणार आहे.राज ठाकरेंचा केवळ एक उमेदवार निवडून आला. कल्याणमधून राजू पाटील विजयी झाले. राज ठाकरेंनी आपल्याला विरोधी पक्षात बसायचं आहे, असं म्हटलं होतं. मात्र त्यांचा एकमेव आमदार सत्तेत जाण्याची शक्यता आहे. पाटील यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून मंत्रिपदं दिलं जाऊ शकतं. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि मनसेनं अनेक ठिकाणी एकमेकांना सहकार्य केलं होतं. त्याची परतफेड म्हणून पाटील यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
Maharashtra Government: राज्याच्या सत्ताकारणाला वेगळा आकार; राज ठाकरेंचं 'ते' स्वप्न भाजपा करणार साकार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 12:57 PM