मुंबई - अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अखेर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार येणार हे आता निश्चित झाले आहे. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. दरम्यान, नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला असून 28 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6.40 वाजता दादर येथील शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी 'अभी तो पूरा आसमान बाकी है' असं नवं ट्विट केलं आहे.
संजय राऊत यांनी बुधवारी (27 नोव्हेंबर) 'अभी तो इस बाज की असली उड़ान बाकी है, अभी तो इस परिंदे का इम्तिहान बाकी है, अभी अभी मैंने लांघा है समुंदरों को, अभी तो पूरा आसमान बाकी है' असं ट्विट केलं आहे. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्यात महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक उलथापालथ पाहायला मिळाली. मात्र याबाबत बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठं विधान केलं. सगळं ठरल्याप्रमाणेच झालंय, अनेक गोष्टी ठरल्याप्रमाणे झाल्या असं सांगत मोठा ट्विस्ट आणला.
आवश्यक संख्याबळ पाठीशी नसल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाराष्ट्र विकास आघाडीने सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या. तिन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांसह अन्य मित्रपक्षांच्या नेत्यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सर्वोच्च निकालामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं. 'सत्य मेव जयते' असं ट्विट करून सत्याचाच विजय होत असल्याचं राऊत यांनी म्हटलं. 'आपली न्यायव्यवस्था ही पारदर्शक आणि तटस्थ आहे. सत्याचा विजय होतो हे न्यायव्यवस्थेने दाखवून दिलं आहे. आमच्या मागण्या न्यायालयाने मान्य केल्या आहेत. आम्ही सत्य बोलत होतो. देशामध्ये न्यायालयात सत्य पराभूत होऊ शकत नाही. आम्ही तयार आहोत. तीस मिनिटांत बहुमत सिद्ध करू शकतो' असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. तसेच राऊत यांनी मंगळवारी निर्णयानंतर आपल्या ट्विटर अकाऊंटवरून 'सत्य मेव जयते...' आणि 'सत्य परेशान हो सकता है...पराजित नही हो सकता...' असे दोन ट्विट केले होते.
बहुमत चाचणीला सामोरं न जाताच फडणवीसांचं सरकार पळून गेलं. इतकी नाचक्की महाराष्ट्रात कोणत्याच सरकारची व राजकीय पक्षाची झाली नव्हती, अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपाला लक्ष्य केलं आहे. महाराष्ट्रातील एक मस्तवाल हैदोस थांबला. आता सर्व शुभ घडेल, असा विश्वास शिवसेनेनं सामनामधून व्यक्त करण्यात आला आहे. सगळ्यांच्या वल्गना हवेतच विरल्या. शेवटी देवेंद्र फडणवीसांचं औटघटकेचं राज्य विश्वासदर्शक ठरावाला सामोरं न जाताच कोसळलं. ज्यांच्या पाठिंब्यावर फडणवीस यांनी सरकार स्थापनेचा दावा केला, त्या अजित पवार यांनी सगळ्यात आधी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला व अजित पवारांच्या पाठीशी दोन आमदारही उरले नाहीत हे पक्के झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांनाही जावे लागले. भ्रष्ट आणि बेकायदा मार्गानं महाराष्ट्राच्या बोकांडी बसलेलं सरकार फक्त ७२ तासांत गेलं. बहुमताचा साधा आकडा नसतानाही फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, हा पहिला गुन्हा व ज्यांच्या पाठिंब्यावर शपथ घेतली त्या अजित पवारांवरील भ्रष्टाचाराचे सर्व गुन्हे चार तासांत मागे घेतले, हा दुसरा गुन्हा. या गुन्ह्यांसाठी जागा निवडली मुंबईच्या राजभवनाची. जेथे संविधानाचं रक्षण व्हावं, त्या संविधानाच्या संरक्षकांनीच या गुन्ह्यांस कवच दिलं. त्यामुळे आज ज्यांनी संविधान दिवस साजरा करण्याचं ढोंग केलं त्यांनाही सर्वोच्च न्यायालयानं चपराक मारली आहे, अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपावर तोफ डागली.