- जमीर काझी मुंबई : गेल्या चार आठवड्यांपासून महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता कायम असल्याने, राज्यात कोण सरकार स्थापन करणार आणि केव्हा अस्तित्वात येणार? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. सट्टेबाजार मात्र शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांची एकत्रित महाशिवआघाडी अस्तित्वात येईल, याबाबत ठाम आहेत. सट्टेबाजारात मंगळवारी महाशिवआघाडीसाठी एक रुपयाला ७० पैसे तर भाजप सरकारसाठी रुपयाला साडेपाच रुपये दर लावण्यात आला.गेल्या महिन्यात निकाल जाहीर झाल्यापासून सट्टेबाजारात भाजप सरकार पुन्हा सत्तेवर येईल, हा बुकींचा विश्वास दिवसेंदिवस कमी होत गेला आहे. आता नवीन सरकार नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात नव्या सरकारची स्थापना होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र, शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी ‘फिफ्टी-फिफ्टी’च्या फार्म्युल्यावर अडून बसल्याने भाजपाला सर्वाधिक जागा जिंकूनही सत्ता स्थापन करता आली नाही, तर सेना व काँग्रेस आघाडीकडून अद्याप बहुमत असल्याचे दाखविलेले नाही. त्यामुळे आठवड्याभरापासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे. सेना व कॉँग्रेस आघाडीही एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असली, तरी पक्षश्रेष्ठींकडून अद्याप त्याला हिरवा कंदील मिळालेला नाही.आघाडीच्या नेत्यांनी केवळ चर्चेचे गुन्हाळ चालू ठेवले आहे. तर १०५ जागा जिंकलेल्या भाजपने आपल्याशिवाय राज्यात सत्ता स्थापन होणार नाही, असा दावा केला आहे. महाराष्ट्रातील या घडामोडीवर सध्याचा सट्टेबाजारही रंगला आहे. निकालानंतरचा पहिला आठवडा वगळता बुक्कींनी भाजप सरकारऐवजी महाशिवआघाडीला पसंती दिली आहे. येथील राजकीय सत्तानाट्याकडे पूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे त्यावर मुंबईसह अहमदाबाद, सूरत, बंगळुरू आणि दिल्लीतही सट्टा लावला जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.येणाऱ्या काळात सत्तेचे गुुऱ्हाळ ज्याप्रमाणे चालू राहील त्याप्रमाणे दर कमी- जास्त होणार आहेत. पण सध्या मात्र महाशिवआघाडीलाच पसंती असल्याचे दिसून येते आहे.शिवसेना आक्रमक झाल्यानंतर बदलले गणितविधानसभेचे निकाल २४ ऑक्टोबरला जाहीर झाल्यानंतर पहिले २, ३ दिवस महायुतीचे सरकार अस्तित्वात येईल, या शक्यतेने त्यासाठी एक रुपयाला ४० पैसे इतका दर होता, तर कॉँग्रेस आघाडीसाठी एक रुपयाला ९ रुपये इतका भाव बुकींकडून दिला जात होता. मात्र, शिवसेना मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावर आक्रमक झाल्यानंतर त्यांचे भाव कमी होत गेले. मात्र, भाजप सरकारसाठी जादा भाव दिला जात आहे.
Maharashtra Government: सत्ताबाजारात कोणाची बाजी? सट्टेबाजांचा कौल कोणाला?; जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 3:04 AM