Maharashtra Government : मुनगंटीवारांनी नारायण राणेंची हवाच काढली, सत्ता स्थापनेचा दावा म्हणजे...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 12:01 PM2019-11-13T12:01:21+5:302019-11-13T12:03:01+5:30
शिवसेनेने शेतकऱ्यांना आश्वासने दिली आहेत. शेतीही पाहून आले आहेत. पण त्यांना सरकार स्थापन करण्यात अपयश आले आहे
मुंबई - भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकार स्थापनेचा नारायण राणेंचा दावा फेटाळला आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सत्तास्थापनेचे प्रयत्न करू असे आश्वासन दिल्याचे भाजपाचे राज्यसभेचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी म्हटले होते. मात्र, मुनंगटीवार यांनी राणेंची हवाच काढून घेतल्याचं दिसून येतंय.
पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी “नारायण राणे यांचं सरकार स्थापनेविषयीचं मत त्यांचं व्यक्तिगत मत आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत असा कोणताही निर्णय झालेला नाही,” असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात सत्तास्थापनेसाठी भाजपाला मदत करणे माझे कर्तव्य आहे. सत्तास्थापनेसाठी जे करावे लागेल ते करेन, आम्ही प्रयत्न करू, असे राणेंनी म्हटले होते. तसेच, शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाईल असे मला वाटत नाही, असेही राणे यांनी म्हटले होते.
शिवसेनेने शेतकऱ्यांना आश्वासने दिली आहेत. शेतीही पाहून आले आहेत. पण त्यांना सरकार स्थापन करण्यात अपयश आले आहे, असे मला वाटते. भाजपा राज्यपालांकडे जाईल तेव्हा 145 आमदारांची यादी असेल रिकाम्या हाताने जाणार नाही, असा टोला राणेंनी शिवसेनेला लगावला. शिवसेना नैतिकतेला धरून वागली नाही. महायुतीमध्ये बहुमत मिळाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठका होतात पण निर्णय होत नाही. ते शिवसेनेला उल्लू बनवत आहेत. काँग्रेसचे नेते एकीकडे बोलतात आणि दुसरीकडे कसे वागतात हे शिवसेनेला कळायला हवे. युती म्हणजे वचन असते ते शिवसेनेने पाळले नाही, असा आरोपही राणेंनी केला होता. तसेच, राणेंनी सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करणार असल्याचंही म्हटलं होतं. मात्र, सुधीर मुनगंटीवारांनी राणेंच्या वक्तव्याचा भाजपाशी संबंध नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय.
दरम्यान, सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला वेळ वाढवून देण्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नकार दिला होता. फक्त शिवसेना किंवा राष्ट्रवादीलाच नव्हे तर भाजपला सुद्धा राज्यपालांनी वेळ वाढवून देण्यास नकार दिला असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.