मुंबई - राज्यात महाशिवआघाडीचं सरकार येईल आणि ते 5 वर्षे टिकेल, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे. त्यामुळे लवकरच राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार स्थापन होणार हे निश्चित झाले आहे. तर, मी पुन्हा येईन.. म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आता केवळ आमदार बनूनच विधानसभेत यावे लागणार आहे. मात्र, राष्ट्रपटी राजवट लागू झाल्यानंतरही सरकार आमचेच येणार.. असं भाजपा नेत्यांकडून सांगण्यात येते. त्यावर, सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं बाण सोडले आहेत.
शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाजपा नेत्यांवर शरसंधान साधले असून भाजपा नेत्यांची अवस्था वेड्यांसारखी झाल्याचं म्हटलं आहे. आम्हाला त्यांची काळजी वाटते, असा उपरोधात्मक टोलाही शिवसेनेनं लगावला आहे. सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 20 दिवस शिवसेनेची खिंड लढवत, भाजपाला सत्तेपासून दूर केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी सतत संपर्कात राहून संजय राऊत यांनी शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार हे विधान खरं करुन दाखवण्याकडे आगेकूच केली आहे. तर, सामनाच्या अग्रलेखातून भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे.
''सरकार स्थापन करण्यास आम्ही असमर्थ आहोत असे सांगणारे राष्ट्रपती राजवट लागू होताच 'आता सरकार फक्त आमचेच बरे का!' हे कोणत्या तोंडाने सांगत आहेत? राष्ट्रपती राजवटीच्या पडद्याआड घोडेबाजार भरवण्याचे हे मनसुबे आता उघड झाले आहेत. ''पुन्हा आमचेच सरकार!'' अशा किंकाळ्या महाराष्ट्राच्या कानाचे पडदे फाडत आहेत. अशाने जनतेचे कान बधिर होतील, पण किंकाळ्या मारणाऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडेल. आम्हाला चिंता वाटते, महाराष्ट्रात वेड्याच्या रुग्णांत भर झाल्याच्या बातम्या राज्याच्या प्रतिष्ठेला बाधक आहेत. आम्ही त्या सगळ्यांना पुन्हा प्रेमाचा सल्ला देतो, इतके मनास लावून घेऊ नका. 'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा' हे जसे सत्य तसे कुणीच अजिंक्य नाही हेसुद्धा सत्यच आहे. महाराष्ट्रात सत्य भगव्याच्या तेजाने फडकणार आहे.
राज्यात नवी समीकरणे जुळून येत असल्याने अनेकांना पोटाचे विकार सुरू झाले आहेत. कोण कसे सरकार बनवतो तेच पाहतो अशा प्रकारची अप्रत्यक्ष भाषा व कृती सुरू झाली आहे. सरकार बनवलेच तर ते कसे आणि किती दिवस टिकते ते पाहू असे शाप दिले जात आहेत. सहा महिन्यांच्या वर सरकार टिकणार नाही असे 'भविष्य' सांगितले जात आहे. हा नवा धंदा लाभदायक असला तरी अंधश्रद्धा कायद्यात मोडतो. स्वतःचे षंढत्व लपवण्यासाठी सुरू झालेले हे उद्योग महाराष्ट्राच्या मुळावर येणारे आहेत. महाराष्ट्राचे आपण मालक आहोत व देशाचे आपण बाप आहोत असे कुणाला वाटत असेल तर त्यांनी या खुळ्या मानसिकतेतून सर्वप्रथम बाहेर पडले पाहिजे. ही मानसिक अवस्था 105 वाल्यांच्या आरोग्यास धोकादायक आहे. ही स्थिती जास्त काळ राहिली तर मानसिक संतुलन बिघडून वेडेपणाच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू होईल'', असे म्हणत शिवसेनेनं भाजपवर जहरी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नाव न घेता समाचार घेतला.