मुंबई: राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांच्यासोबत गेलेले आणखी तीन आमदार परतले आहेत. त्यामुळे अजित पवारांसोबत केवळ एक आमदार राहिला आहे. विशेष म्हणजे अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना परत आणण्यात शिवसेनेनं महत्त्वाची भूमिका बजावली. अजित पवारांसोबत गेलेले आमदार माघारी फिरल्यानं विश्वासदर्शक ठरावावेळी नेमकं काय होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.शनिवारी सकाळी अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे १३ आमदार होते. मात्र त्याच दिवशी यातले बहुतांश आमदार त्याच दिवशी माघारी परतले. कालपर्यंत ५ आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात नव्हते. त्यातील अनिल पाटील, दौलत दरोडा आणि नितीन पवार हे तीन आमदार मुंबईत परतले आहेत. त्यामुळे आता केवळ दोन आमदार आता राष्ट्रवादीच्या संपर्कात नाहीत. त्यातील एक स्वत: अजित पवार आहेत. अजित पवारांसोबत गेलेले अण्णा बनसोडे यांच्याशी राष्ट्रवादीचा संपर्क होऊ शकलेला नाही. राष्ट्रवादीच्या तीन आमदारांना माघारी आणण्यात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची महत्त्वाची भूमिका बजावली आहे.महाविकासआघाडीकडून सत्ता स्थापनेची तयारी सुरू असताना शनिवारी सकाळी अजित पवारांनी राजभवनावर जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. अजित पवार थेट भाजपासोबत गेल्यानं मोठा राजकीय भूकंप झाला. यानंतर काल अजित पवारांनी त्यांना शुभेच्छा देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांचे ट्विटरवरुन आभार मानले. मात्र यानंतर लगेचच आपण राष्ट्रवादीतच असून शरद पवारच आपले नेते असल्याचं ट्विट करत गुगली टाकली.
Maharashtra Government: राष्ट्रवादीचे आणखी तीन आमदार परतले; आता अजित पवारांसोबत फक्त एक आमदार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 8:50 AM