Maharashtra Government: ईडीची फाईल आताच कशी काय उघडते?; शिवसेनेकडून नव्या मित्राचा 'आदर्श' बचाव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 10:38 AM2019-11-28T10:38:39+5:302019-11-28T10:39:38+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून रंगलेल्या राजकीय नाट्याला आज पूर्णविराम मिळणार आहे.
मुंबईः गेल्या अनेक दिवसांपासून रंगलेल्या राजकीय नाट्याला आज पूर्णविराम मिळणार आहे. महाविकास आघाडीचे नेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शपथविधीमुळे शिवसैनिकांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो आहे. भाजपाला आपल्या धारदार विधानांनी जेरीस आणणारे संजय राऊतांनीही महाराष्ट्रासाठी आज ऐतिहासिक दिवस असल्याचं म्हटलं आहे. माननीय उद्धव ठाकरे आज शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. महाराष्ट्रासाठी आज आनंदाचा तितकाच ऐतिहासिक दिवस आहे. साधारण 20 वर्षांनंतर पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री हा महाराष्ट्रात शपथ घेतोय, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.
महिन्याभराचा संघर्ष आपण पाहिलेलाच आहे, त्या संघर्षाला अखेर यश मिळालं आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून कायदेशीर आणि राजकीय असे अनेक डावपेच टाकण्यात आले. त्या सगळ्यांवर मात करून आजचा दिवस उगवलेला आहे. मला वाटतं हे सरकार पूर्ण पाच वर्षं टिकेल. केंद्राच्या ताब्यात ज्या संस्था आहेत, त्यांचा गैरवापर पुन्हा केला जाईल, असं म्हणत त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. कालपर्यंत जे सत्ताधारी होते, त्यांच्यासुद्धा ईडी किंवा सीबीआयमार्फत चौकशा व्हाव्यात, अशा प्रकारचे काही पुरावे समोर आलेले आहेत. परंतु उद्धव ठाकरेंनी आधीच स्पष्ट केलेलं आहे की, आम्ही सुडाचं राजकारण करणार नाही.
तुम्ही चौकशांचा कितीही ससेमिरा लावला. तुम्ही कितीही अडथळे आणले तरी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील हे जे सरकार आहे. त्याला अजिबात तडा जाणार नाही. आम्ही संकटांवर मात करू आणि सरकार टिकवू. सरकारमध्ये सहभागी होतानाच ईडीची फाइल कशी काय ओपन केली जाते. हे सर्व हातखंडे वापरण्यात आलेले आहेत, आदर्श प्रकरणावरून राऊतांनी भाजपावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंचं सरकार येऊ नये, यासाठी राष्ट्रपतींपासून राजभवनापर्यंत आणि सीबीआयपासून ईडीपर्यंत सर्वांचा दुरुपयोग करण्यात आला, पण या सर्वांनाच आम्ही मात दिलेली आहे. पंतप्रधानांनीही उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.