मुंबई - राज्यात अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अखेर सरकार स्थापन होणार आहे. नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला असून 28 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6.40 वाजता दादर येथील शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. तत्पूर्वी विधिमंडळात सर्व आमदारांचा शपथविधी संपन्न झाला. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी सर्व आमदारांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आमदारकीची शपथ घेतली आहे. शपथविधीनंतर येत्या काळात नवा महाराष्ट्र घडणार असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
आदित्य ठाकरे यांनी आमदार म्हणून निवडून दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले आहेत. 'आम्ही एकत्र काम करून महाराष्ट्राला पुढे घेऊन जाऊ, आज अनेक तरुण आमदारांनी शपथ घेतली आहे. आम्ही सगळे तरुण मिळून अनेक चांगले काम करू. नवा महाराष्ट्र घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे' असं आदित्य यांनी म्हटलं आहे. तसेच मंत्रिमंडळाबाबत निर्णय सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे घेतील. महाराष्ट्राची सेवा करण्याचं काम नीट पार पाडू असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
'वेगळा अनुभव होता. दुष्काळमुक्त महाराष्ट्र, प्रदूषणमुक्त महाराष्ट्र, बेरोजगारीमुक्त महाराष्ट्र झाल्यावर बाळासाहेबांचं स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण होईल' असं देखील माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय घडामोडीनंतर राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाचे महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांनी आगामी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड केली.
शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीच्या सोहळ्याला त्यांचे लहान बंधू मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राजकारण व कुटुंब वेगळं ठेवणारे ठाकरे कुटुंब उद्धव ठाकरेंच्या शपथविधाला पुन्हा एकत्र पाहायला मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी देखील राज ठाकरे शपथविधीला उपस्थित राहिल्यास आनंद होईल असं मत व्यक्त केलं आहे.