पुणे : महिलांच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविण्यासाठी सरकारने लोह आणि आयोडिनयुक्त मीठ वितरीत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते काही शिधापत्रिकाधारकांना मीठ वितरीत करुन सोमवारी या योजनेची सुरुवात करण्यात आली.
नाना पेठ येथील क्रांती ज्योती स्वस्त धान्य दुकानातील शिधापत्रिकाधारकांना प्रातिनिधीक स्वरुपात मीठाचे वितरण करुन या योजनेची सुरुवात बापट यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी पुरवठा विभागाच्या उपायुक्त नीलिमा धायगुडे, अन्न धान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे, पुणे कॅन्टोनमेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष दिलीप गिरमकर या वेळी उपस्थित होते.
पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, राज्यात नागपूर आणि पुणे या दोन जिल्ह्यात मीठ विक्रीची सुरुवात झाली आहे. त्या पाठोपाठ इतर जिल्ह्यांतही अशा पद्धतीच्या मीठाचे लवकरच वितरण करण्यात येईल. शहरातील महिलांच्या आरोग्य तपासणीत ५ ते १५ वयोगटातील ९८ टक्के महिलांमध्ये रक्तातील लोहाचे प्रमाण कमी आढळून आले आहे. त्यामुळेच आयोडिन आणि लोहयुक्त मीठ वितरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. चौथ्या राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणानुसार राज्यातील सहा महिने ते ५ वर्षे वयाच्या ५३.८ टक्के मुलांमध्ये आणि १५ ते ४९ वर्षे वयाच्या महिलांमध्ये ४८ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात हिमोग्लोबिनचा आभाव आढळून आला आहे. लोह आणि इतर पोषक द्रव्ये मिळाल्यास हा आजार नियंत्रणात येऊ शकतो. त्यासाठी लोह व आयोडिनयुक्त मीठ वितरीत करण्याचा प्रस्ताव टाटा ट्रस्टने सरकारकडे सादर केला होता. त्या पार्श्वभूमीवर पथदर्शी प्रकल्प म्हणून १२ महिन्यांसाठी लोहयुक्त मीठ पुणे व नागपुर शहरातील शिधापत्रिकाधारकांना वितरीत करण्यात येणार आहे. सध्या शहरात अंत्योदयचे ९ हजार ७५२ शिधापत्रिकाधारक असून, त्यावर ४१ हजार १५७ लाभार्थी आहेत. या शिधापत्रिकाधारकांना प्रतिकार्ड २० किलो गहू आणि १५ किलो तांदूळ आणि १ किलो साखर देण्यात येते. अन्नसुरक्षेचा शिक्का असलेली ३ लाख ३८ हजार ६९६ शिधापत्रिका शहरात आहेत. त्यावर १३ लाख ७४ हजार ३५२ लाभार्थ्यांची नोंद आहे. त्यांना प्रति लाभार्थी ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ देण्यात येते. गहू २ रुपये आणि तांदूळ ३ रुपये किलो दराने मिळते.