मुंबई: अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या MPSC च्या नियुक्त्यांबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज महत्वाची बैठक पार पडली. यात MPSCने शिफारस केलेल्या 817 जागांबाबत चर्चा झाली आहे. तसेच, एसईबीसी प्रवर्गातील 48 विद्यार्थ्यांसह 413 विद्यार्थ्यांना लवकर नियुक्ती देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.
राज्याचे सामान्य प्रशासन मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज झालेल्या बैठकीत MPSC ने 817 जागांसाठी केलेल्या शिफारशीबाबतही चर्चा झाली. तसेच, SEBCच्या जागांबाबत राज्य सरकारने विधी व न्याय विभागाचा अभिप्राय मागितला आहे. आज संध्याकाळपर्यंतच तो अभिप्राय येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
परीक्षांचे वेळापत्रक एक वर्ष आधी जाहीर करण्याची सूचनाबैठकीत 48 एसईबीसीसह 413 विद्यार्थ्यांना लवकरात लवकर नियुक्ती देण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तसेच, 817 पदांची भरती लवकरच होणार असून, एसईबीसीच्या कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नसल्याचा विश्वास भरणेंनी बोलून दाखवला. त्याचबरोबर UPSC च्या धर्तीवर MPSC चे वेळापत्रक एक वर्ष आधी जाहीर करण्याची सूचनाही अजित पवारांनी MPSCला दिल्याचे भरणे म्हणाले.