मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर केली.
राज्यात ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यासाठी राज्यपालांनी शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंतच्या खरिप पिकांसाठी 8 हजारांची मदत जाहीर केली आहे. तर दोन हेक्टरपर्यंतच्या फलोत्पादन / बारमाही पिकांसाठी 18 हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. याबाबत राज्यपालांनी तातडीने मदत वाटप करण्याचे आदेश राज्य प्रशासनाला दिले आहेत.
याशिवाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शाळा, महाविद्यालयातील परीक्षा शुल्क माफ करण्याचा तसेच आपद्ग्रस्त क्षेत्रात शेतसारा माफ करण्याचा निर्णयही राज्यपालांनी जाहीर केला आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे. त्यामुळे राजकीय पक्षाच्या नेत्यांनी नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेऊन राज्यपालांकडे मदत जाहीर करण्याची मागणी केली होती.
दरम्यान, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे राज्यपालांनी केलेली मदत तुटपुंजी असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्यपालांच्या या मदतीवर टीकास्त्र सोडले आहे. राज्यपालांनी बाहेर पडून नुकसानीची पाहणी करावी. ही मदत म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा आहे. काळी टोपी घालून राजभवनात बसून शेतकऱ्यांचे दु:ख कळणार नाही, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.