Maharashtra Politics: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानाचे पडसाद महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. यातच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श होते. तर, तर नितीन गडकरी हे सध्याचे आदर्श आहेत, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांनी म्हटले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बोलत होते. यावेळी भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली. या पदवीदान समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी डीलिट पदवी देऊन गौरवण्यात आले.
शिवाजी महाराज तर जुन्या युगातील आहेत
आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची. मला आता असं वाटतं तुम्हाला कोणी विचारलं तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या युगातील आहेत. मी आधुनिक युगाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये शैक्षणिक कामात प्रगती नसतांना येथे लक्ष घातले आणि मिलिंदच्या माध्यमातून शिक्षण दिले. महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे हे विद्यापीठ आहे. याच्या निर्मितीपासूनचा कालखंड मला आठवतो. याच्या जडणघडणीत माझा समावेश होता याचा आनंद आहे. आज विद्यापीठाने डिलीट पदवी प्रदान केली यासाठी अंतकरणापासून आभारी आहे. नितीन गडकरी आणि माझ्या कामाची दखल घेतली गेली यासाठी कृतज्ञता व्यक्त करतो. या विद्यापीठाच्या स्थापनेत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा वाटा आहे. या भागात विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय नेतृत्वाने घेऊन संपूर्ण मराठवाड्याच्या शिक्षणाचे दालन खुले झाले. विद्यापीठासाठी संघर्ष झाला. याचा भागात आणखी एक विद्यापीठ स्थानक करण्याच्या प्रक्रियेत माझा सहभाग होता याचा आनंद आहे. यामुळे येथे शैक्षणिक दालन खुले झाले, या शब्दांत शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"