मुंबई/लातूर: सोयाबीन प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यासाठी फडणवीस सरकारनं लातूरमध्ये योगगुरू रामदेव बाबांच्यापतंजली समूहाला जमीन देऊ केली आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडसाठी राखीव असलेल्या भूखंडाचा काही भाग पतंजलीला देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी सरकारनं पतंजली समूहाला मुद्रांक शुल्कमाफीदेखील देऊ केली आहे, असं वृत्त पीटीआयनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. लातूरच्या औसामध्ये पतंजलीनं सोयाबीन प्रक्रिया केंद्र सुरू करावं यासाठी फडणवीस सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी २६ जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदेव बाबांना पत्रदेखील लिहिलं. औसा भागात एमएसएमई (सूक्ष्म, लघू आणि मध्यम) प्रकल्प सुरू करण्याचं निमंत्रण मुख्यमंत्र्यांनी पत्रातून दिलं. 'एमएसएमई प्रकल्पासाठी तुम्हाला मुद्रांक शुल्कातून १०० टक्के सूट देण्यात येईल. याशिवाय वीजेच्या दरातही ठराविक कालावधीसाठी सवलत दिली जाईल. वीजेच्या एका युनिटमागे एक रुपयांची सूट देण्यात येईल,' असं मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटलं आहे. औसामध्ये भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडसाठी भूखंड राखीव ठेवण्यात आला आहे. यातील ४०० एकर जागा पतंजलीला देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख केंद्रात अवजड उद्योग खात्याचे मंत्री असताना त्यांनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडसाठी भूखंड राखीव ठेवला. मात्र एक दशक उलटून गेल्यानंतरही या जागेवर प्रकल्प सुरू झालाच नाही. औसा भागात पतंजली नेमकं कोणतं केंद्र सुरू करणार आहे, याची माहिती उपलब्ध नसल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. या भागात सोयाबीन प्रक्रिया प्रकल्प सुरू होईल, अशी शक्यता या अधिकाऱ्यानं वर्तवली. जिल्ह्यात दोन सोयाबीन प्रक्रिया प्रकल्प केंद्रं असल्यानं पतंजलीदेखील अशाच प्रकारचा प्रकल्प सुरू करेल, असा अंदाज अधिकाऱ्यानं व्यक्त केला.
महाराष्ट्रात या, प्रकल्पासाठी सवलतीत जागा घ्या; रामदेवबाबांना फडणवीस सरकारची 'स्पेशल' ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 12:02 PM