Gram Panchayat Election Results: स्थानिक आघाड्यांचेच वर्चस्व; भाजप, काँग्रेसचा दावा - आम्हीच नंबर वन!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 12:36 AM2021-01-19T00:36:28+5:302021-01-19T06:57:53+5:30
राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांच्या समर्थकांकडे तर हिवरेबाजार गावात माजी सरपंच पोपटराव पवार यांच्याकडे मतदारांनी पुन्हा सत्तासुत्रे सोपविली. मात्र पाटोदा (जि. बीड) या गावात माजी सरपंच भास्कर पेरे यांचे पर्व संपुष्टात आले. पेरे यांनी निवडणूक लढवली नाही, मात्र त्यांच्या कन्येचा पराभूत झाल्या आहेत.
मुंबई : राज्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. निकालानंतर राजकीय पक्षांनी विजयाचे दावे-प्रतिदावे केले असले तरी या निवडणुकीत स्थानिक पातळीवरील आघाड्यांनीच बाजी मारल्याचे दिसून आले. आमदार-खासदारांपैकी बहुसंख्य लोकप्रतिनिधींना आपापली गावे राखली. मात्र काही गावात नेत्यांना मतदारांनी अनपेक्षित धक्केही दिले.
राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांच्या समर्थकांकडे तर हिवरेबाजार गावात माजी सरपंच पोपटराव पवार यांच्याकडे मतदारांनी पुन्हा सत्तासुत्रे सोपविली. मात्र पाटोदा (जि. बीड) या गावात माजी सरपंच भास्कर पेरे यांचे पर्व संपुष्टात आले. पेरे यांनी निवडणूक लढवली नाही, मात्र त्यांच्या कन्येचा पराभूत झाल्या आहेत.
आता सरपंचपदाच्या सोडतीकडे लक्ष
आज निकाल लागलेल्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये एक महिन्याच्या आत सरपंचपदाचे आरक्षण काढणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. बोगस दाखले काढून निवडणूक लढवली जात होती, सरपंच पदाची सोडत निवडणुकीनंतर करण्याच्या निर्णयामुळे या प्रकाराला आळा बसला तसेच मतदानाची टक्केवारी देखील वाढली असे ते म्हणाले.