Maharashtra Guardian Ministers List: महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ स्थापन होऊन दीड महिना उलटला, तरीही पालकमंत्र्यांची यादी जाहीर होत नव्हती. अखेर ती लटकलेली पालकमंत्र्यांची नियुक्ती आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली. शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ ३० जूनला घेतली होती. ९ ऑगस्टला भाजपच्या ९ तर शिंदे गटाच्या ९ कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी झाला होता. तेव्हापासून पालकमंत्रीच नियुक्त न झाल्याने अनेक अडचणी येत होत्या. अखेर याला आज पूर्णविराम मिळाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वाधिक म्हणजेच नागपूर, वर्धा,अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असणार आहे. याशिवाय, एकनाथ शिंदे गटाची भूमिका परखडपणे मांडणारे दीपक केसरकर यांना अनपेक्षितरित्या, मुंबई शहरचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. तसेच त्यांच्याकडे कोल्हापूरचे पालकमंत्रीपदही असणार आहे.
पाहा पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी
- दीपक केसरकर- मुंबई शहर, कोल्हापूर
- मंगलप्रभात लोढा- मुंबई उपनगर
- राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर
- सुधीर मुनगंटीवार- चंद्रपूर,गोंदिया
- चंद्रकांत पाटील- पुणे
- विजयकुमार गावित- नंदुरबार
- गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड
- गुलाबराव पाटील- जळगाव, बुलढाणा
- दादा भुसे- नाशिक
- संजय राठोड- यवतमाळ, वाशिम
- सुरेश खाडे- सांगली
- संदिपान भुमरे-औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
- उदय सामंत- रत्नागिरी, रायगड
- तानाजी सावंत- परभणी, उस्मानाबाद(धाराशिव)
- रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग
- अब्दुल सत्तार- हिंगोली
- अतुल सावे- जालना, बीड
- शंभूराज देसाई- सातारा, ठाणे