पुणे : माझ्या कुटुंबाला, शरद पवार साहेबांना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना नुकतीच आयकर विभागाची नोटीस मिळाली आहे. मात्र या नोटिसांना आम्ही सविस्तरपणे उत्तर देण्याचे ठरवले आहे. पण मागच्या वर्षी सुद्धा अशाचप्रकारे एक नोटीस शरद पवार साहेबांना मिळाली होती. त्याचा परिणाम संबंध महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने पाहिला आहे. त्यामुळे 'त्यांनी त्यांचे काम केले आहे, आम्ही आमचे काम करू..'' अशा शब्दात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आयकर विभागाच्या नोटिसांवर भाष्य केले आहे.
पुण्यात जिल्हा परिषदेच्या एका कार्यक्रमाला सुप्रिया सुळे ह्या उपस्थित होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर बॉलिवूडमधले ड्रग्ज कनेक्शन समोर येत आहे. मात्र तपास करणाऱ्या संस्थांकडून सेलिब्रेटी व हाय प्रोफेशनल अशाच काही मोजक्या महिलांना चौकशीसाठी बोलावण्यात येत आहे.मात्र हे प्रकरण वाटते तितके सोपे नाही. या प्रकरणाच्या मुळापर्यंत जात ते नष्ट करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे राज्यात जसे आम्ही तंबाखू मुक्त अभियान राबवत आहोत तसेच केंद्र सरकारने ड्रग्जमुक्त अभियान सुरु करण्याची मोठी गरज आहे. “ महाविद्यालयीन जीवनापासून मी तंबाखू विरोधात काम करत आले आहे. त्यामुळे व्यसनांना समाजात जागाच असू नये, असे माझे स्पष्ट मत आहे.
ड्रग्जप्रकरणी तीन- चार सेलिब्रेटी महिलांना चौकशीसाठी बोलवून काय होणार..
तंबाखु, धूम्रपान, ड्रग्ज यांसारख्या व्यसनांबाबत विद्यार्थी आणि तरुण वर्गांमध्ये शालेय व महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन तसेच जागरूकता निर्माण करणे खूप गरजेचे आहे. व्यसनांच्या विरोधात जर आपण प्रभावीपणे काम करू शकलो तर तरुण वर्ग ड्रग्जसारख्या गोष्टींपासून दूर राहील. पण आजमितीला ड्रग्जप्रकरणी तीन-चार सेलिब्रेटी किंवा हाय प्रोफाइल महिलांना चौकशीसाठी बोलावून काहीही साध्य होणार नाही. व्यसनांचे दुष्ट्चक्र हे जडसें उखडना जरुरी है असे मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सध्या सुरु असलेल्या ड्रग्ज चौकशीवर केले.