मध्य प्रदेशाच्या धर्तीवरच महाराष्ट्रानं देखील ओबीसीचा डेटा गोळा केला आहे. त्यामुळे न्यायालयाने संबंधित अहवाल मान्य केला पाहिजे. सदर अहवाल मान्य झाला तर राज्यातील निवडणूक प्रक्रिया ओबीसी आरक्षणासह राबवली जाऊ शकते, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. राज्य निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील ९२ नगरपालिका आणि ४ नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला.
९२ नगरपालिका आणि ४ नगरपंचायतीच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय जाहीर करण्यात आल्या आहेत. वास्तवीक ही निवडणूक ओबीसी आरक्षणासह घ्यायला हवी, अशी आमची भूमिका आहे, असं अजित पवारांनी सांगितलं. ओबीसी आरक्षणाबाबतचा अहवाल बांठिया समितीनं सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात असून १२ जुलैला यावर सुनावणी होणार असल्याची माहिती अजित पवारांनी यावेळी दिली.
उद्या म्हणजेच ११ जूलै रोजी शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांच्या निलंबणाच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्याचा दिवास शिवसेनेसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे. असं आम्हाला वाटतं. उद्या सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहुयात. मी काही वकिलांना विचारले, १६ लोकांचा निकाल वेगळा लागला पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितली आहे.
दरम्यान, राज्यात काही भागात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तर काही ठिकाणी पावसाने पाठ फिरवली आहे. त्याचप्रमाणे हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने आसना नदीला पूर आल्यामुळे अनेक घरे पाण्याखाली गेली होती. यावेळी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर होते. त्यांनी दिल्लीतून पूरपरिस्थितीचा आढावा घेत हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी फोनद्वारे संवाद साधला होता. त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. याबाबतच अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.