नवी दिल्ली - Sanjay Raut on Eknath Shinde ( Marathi News ) संसदेत मोदींची भाषणे प्रचाराची असते, देशातील कुठल्याही गंभीर प्रश्नावर मोदींनी स्पर्श केला नाही. गेल्या २ वर्षापासून मणिपूरमध्ये हिंसेचा उद्रेक आहे. जम्मू काश्मीरमध्ये लोक रस्त्यावर आले. दिल्लीत निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. चीनची घुसखोरी वाढलीय या सर्व मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य केले. महाराष्ट्रासारखं मोठं राज्य हा गुंडगिरीचा सर्वात मोठा अड्डा झालाय. बेकायदेशीर जे मुख्यमंत्री नेमलेत ते गुंडांना पोसतायेत. पोलीस स्टेशनमध्ये आमदार गोळीबार करतायेत. मोदी काही बोलले का? असं सांगत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.
दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, राज्यातील मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगल्यावर, मंत्रालयात ज्याप्रकारे गुंड टोळ्या येऊन भेटतायेत. शासकीय निवासस्थानी खून, दरोडे, बलात्कार या गुन्ह्यात जामीनावर सुटलेले आणि बाहेर काढलेले या गुंड टोळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून नक्की काय चर्चा करत आहेत. या गुंड टोळ्याचा वापर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मुख्यमंत्री करणार की उद्याच्या निवडणुकीत विरोधकांचे मुडदे पाडण्यासाठी करणार आहेत असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.
देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे
मोदींनी ७८ मिनिटे काँग्रेसवर, नेहरुंवर आणि इंदिरा गांधींवर टीका करत राहिले. काँग्रेसच्या भीतीतून मुक्त व्हा. नेहरुंनी केलेल्या कामाची भीती भाजपाच्या मनातून जात नाही. शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रात १७०० शेतकऱ्यांची आत्महत्या झाली. तुम्ही कोणत्या भाषणाची चर्चा करताय? भाजपाही एकाच प्रॉडक्टवर चाललेले आहे. मोदींशिवाय भाजपाला पर्याय आहे का? हा देश हुकुमशाहीकडे चालला आहे. चंदिगडच्या महापौर निवडणुकीत भाजपाने केलेल्या भ्रष्टाचार हे हुकुमशाहीचे उदाहरण आहे. मोदींनी डोळ्यावर पट्टी बांधलीय त्यांना दिसत नाही का? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला.
तसेच चंदिगडबाबतीत सर्वोच्च न्यायालयाने झापलं त्याला आम्ही फार किंमत देत नाही. आम्ही कोर्टाचा आदर करतो. महाराष्ट्राच्या प्रकरणातही घटनाबाह्य सरकारला सर्वोच्च न्यायलयाने झापलं होते. त्यांच्या झापाझापीचं स्वागत करतो पण निर्णयाचे काय? सर्वोच्च न्यायलयाने झापूनसुद्धा ज्याप्रकारे राहुल नार्वेकर या व्यक्तीने निकाल दिला आणि घटनाबाह्य सरकारला मान्यता दिली. सर्वोच्च न्यायलयाला आम्ही जुमानत नाही अशी शहनशाही चालली आहे. सर्वोच्च न्यायलयाने राहुल नार्वेकरांना किंवा या सरकारला बरखास्त केले का?. सरळ पक्षांतर झाले आहे. संविधान पायदळी तुडवलं आहे आणि सर्वोच्च न्यायलय झापतंय. त्यामुळे आता झापण्यापलीकडची पाऊले टाका असं विधानही संजय राऊतांनी केले आहे.
दरम्यान, गेल्या ७० वर्षात देश उभा राहिलाय त्याची फळे मोदी आणि भाजपा खातायेत. मोदींच्या काळात तुम्ही देशाला किती कर्तबगार बनवलं हे सांगावे. बेरोजगारांना पकोडे तळण्याचा सल्ला देताय. ८० कोटी गरिबांना ५ किलो अन्न फुकट देताय, लोकांना रोजगार हवाय आणि तुम्ही रामलल्लाचे दर्शन फुकटात नेतायेत. या देशातील दहशतवाद आणि गुंडगिरीवर बोला. या देशातील लोकशाही संस्था, संविधानिक संस्था तुम्ही संपवतायेत. ८० कोटी जनतेला ५ किलो फुकट धान्य देऊन मोदींनी देशाला गुलाम केलेले आहे. ही लाच आहे. लोकांना अधिक आळशी बनवण्याचा हा प्रकार आहे. हे नेहरूंपेक्षाही भयंकर आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.