मुंबई : देशातील सर्वात पाचवे मोठे जंगल महाराष्ट्रात आहे. हे जंगल २० चौरस किलोमीटरने वाढले आहे. राज्यभरातील जंगल ५० हजार ७९८ चौरस किलोमीटरवर पसरले आहे. मुंबई शहराचा विचार करता येथील जंगल १११ चौरस किलोमीटरवर पसरलेले आहे. दिल्लीनंतर मुंबईचा क्रमांक लागतो. गेल्या दहा वर्षांत मुंबईतल्या जंगलात ९ टक्के एवढी वाढ नोंदविली आहे. तत्पूर्वी ते १०२ चौरस किलोमीटरवर पसरलेले होते.२०२१ च्या सर्वेक्षणात वनक्षेत्रात वाढराज्यभरातील विविध प्रकल्पांसह अनेक कारणांमुळे जंगल नष्ट होत असल्याची भीती व्यक्त करण्यात आली असतानाच २०२१ च्या वन सर्वेक्षणात वनक्षेत्रात वाढ झाल्याचे दाखले देण्यात आले आहेत. देशातील बहुतांश राज्यातील वनात वाढ नोंदविण्यात येत असतानाच बहुतांशी राज्यांनी आपले वनक्षेत्र विविध माध्यमातून टिकवून ठेवले आहे. क्षेत्रफळानुसार देशातील सर्वात जास्त वनक्षेत्र मध्य प्रदेशात आहे. त्यानंतर अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.वृक्ष संपत्तीचे मूल्यांकनासाठी अहवालपर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी भारतीय वन सर्वेक्षण संस्थेद्वारे तयार करण्यात आलेल्या इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट २०२१ या अहवालाचे प्रकाशन केले.देशातील वन आणि वृक्ष संपत्तीचे मूल्यांकन करण्यासाठी हा अहवाल अनिवार्य करण्यात आला आहे. देशाचे एकूण वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्र ८०.९ दशलक्ष हेक्टर असून हे क्षेत्र देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या २४.६२ टक्के आहे.२०१९ च्या मूल्यांकनाच्या तुलनेत, देशातील एकूण वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्रामध्ये २,२६१ चौरस किलोमीटरची वाढ झाली आहे. सध्या केलेल्या मूल्यांकनातून १७ राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये ३३ टक्क्यांहून अधिक भौगोलिक क्षेत्र वनाच्छादित आहे.खारफुटीचे आच्छादनएकूण क्षेत्र ४,९९२ चौरस किमी आहे.२०१९ च्या मूल्यांकनाच्या तुलनेत खारफुटीच्या आच्छादन क्षेत्रात १७ चौरस किमीची वाढ झाली आहे.ओरिसा ( ८ चौरस किमी ) त्यानंतर महाराष्ट्र (४ चौरस किमी) आणि कर्नाटक ( ३ चौरस किमी) ही खारफुटीच्या आच्छादनामध्ये वाढ दर्शवणारी पहिली तीन राज्य आहेत.
हिरवागार महाराष्ट्र! जंगल क्षेत्रात २० चौरस किलोमीटरनं वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 7:26 AM