मुंबई - महाराष्ट्राची लोकसंख्या लक्षात घेता गुजरातच्या लोकसंख्येशी तुलना होऊ शकत नाही. गुजरातमध्ये कोरोनाचे सक्रिय रुग्ण १७ हजार आहेत तर महाराष्ट्र कितीतरी पटीने जास्त असल्याने महाराष्ट्राला लसीची आवश्यकता अधिक आहे. त्यामुळे केंद्राने लवकरात लवकर लस पुरवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.
महाराष्ट्रात लसीचा तुटवडा पडायला लागला आहे. केंद्राकडून लसीचा पुरवठा देशातील प्रत्येक राज्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात आणि त्या राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भावाचा फैलाव जास्त आहे. त्याप्रमाणात होणं आवश्यक आहे परंतु तसं दिसत नाही असेही जयंत पाटील म्हणाले.
राज्याने केंद्रसरकारकडे अधिकच्या लसी महाराष्ट्रात उपलब्ध करून देण्यासाठी गेले काही दिवस सतत प्रयत्न केला. आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सतत केंद्राशी संपर्कात आहेत. त्यामुळे आमचा आग्रह आहे की, कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता वेळेत लसीची उपलब्धता होणे आवश्यक आहे.
उत्तर प्रदेशमध्ये लसीचा साठा कमी दिला हा केंद्राचा दोष आहे. केंद्राने गुजरातपेक्षा उत्तर प्रदेशमध्ये जास्त लस द्यायला पाहिजे होती परंतु तो त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला महाराष्ट्रात कोरोनाचा रेट जास्त आहे, आरोग्याची व्यवस्था उत्तम आहे, आम्ही फार मोठ्या प्रमाणावर लसीकरण करू इच्छितो त्यामुळे कोरोना मर्यादित आणायचा असेल तर नाईलाजास्तव लॉकडाऊनच्या स्टेजपर्यंत जायला लागलो आहोत अशी माहितीही जयंत पाटील यांनी दिली.