मुंबई : महाराष्ट्रात गेल्या आठवड्याच्या सुरूवातीपासून सुरू असलेली पावसाची बॅटिंग अजूनही अविरतपणे सुरूच आहे. पावसाच्या तडाख्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये पूरपरिस्थिती ओढवली असून बरेच ठिकाणी अशी परिस्थिती ओढवू शकते अशी भिती व्यक्त केली जात आहे. गेल्या आठ ते १० दिवसांपासून राज्यात सर्वदूर सुरू असलेला या आठवड्यातही सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. राज्यात आजही पाऊस सुरूच असून पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात विविध ठिकाणी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
येत्या १५ जुलैपर्यंत राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा, पालघरसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे येथील काही विभागांना 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. पावसाच्या तडाख्याने कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही पिकांचे अतिवृष्टीने नुकसान झाल्याची स्थिती आहे. नाशिक, पालघर आणि पुणे जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून मुंबई, ठाणे, उपनगरं, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कुठे ऑरेंज तर कुठे रेड अलर्ट!
हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्यापर्यंत उत्तर कोकणात सर्वत्र मुसळधार पाऊस असणार आहे. तर दक्षिण कोकणात आणि गोव्यामध्येही काहीशी तशीतच स्थिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या भागांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला असून या विभागात १५ जुलैपर्यंत तुफान पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्याला देखील उद्यापर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या विभागात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याशिवाय, विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.