इंटरनेटद्वारे होता म्होरक्यांशी संपर्कऔरंगाबाद/परभणी/मुंबई : आखाती राष्ट्रांसह अमेरिका, फ्रान्सलाही घातपाती कारवायाने हादरून सोडणाऱ्या ‘इसिस’ने महाराष्ट्रातही मोठा घातपात करण्याचा रचलेला डाव औरंगाबाद आणि नांदेडच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) उधळून लावला. घातपात घडविण्यासाठी स्फोटकांची जुळवाजुळव करणारा इसिसचा एजंट नासेरबीन अबुबकर याफई उर्फ चाऊस (३१, परभणी) याला बुधवारी रात्री परभणीतून अटक करण्यात आली. अटकेनंतर नासेरबीनला एटीएसने औरंगाबादेतील विशेष न्यायालयात हजर केले, तेव्हा न्यायालयाने त्याला २० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईबाबत एटीएसकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नासेरबीन हा इसिसचा समर्थक असून, त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याची माहिती खबऱ्याकडून काही दिवसांपूर्वी नांदेड एटीएसचे निरीक्षक माणिक बेंद्रे यांना मिळाली होती. तेव्हापासून औरंगाबाद आणि नांदेडचे एटीएस पथक नासेरच्या हालचालींवर पाळत ठेवून होते. नासेर हा इसिसचा कट्टर समर्थक असल्याने, तो इंटरनेटद्वारे इराक, सीरिया या देशांतील इसिसच्या म्होरक्यांच्या संपर्कात असल्याचे पुरावे हाती लागताच, एटीएसने त्याला परभणीतील देशमुख गल्ली, गाडीवान मोहल्ला येथून बुधवारी रात्री अटक केली. (लोकमत न्यूजनेटवर्क)परभणीचा नासेर सीरियातील कमांडरच्या संपर्कातनासेरबीन हा सीरियातील ‘इसिस’चा कमांडर असलेल्या फारुकच्या संपर्कात होता, असे तपासात समोर आले आहे. फारुकसोबत नासेरने अनेकदा टिष्ट्वटर, टेलिग्राम, स्काइप, चॅटसेक्युर अशा इंटरनेट मॅसेंजर अॅपवर चॅटिंग केली होती. चॅटिंगमध्ये त्याने इसिसमध्ये भरती होण्याबाबत चर्चा केल्याचे उघडकीस आले. फारुकने त्याला पिस्टल पुरविण्याचेही आश्वासन दिलेले होते, लवकरच ते त्याला मिळणार होते. उच्च विद्याविभूषित नासेर : आरोपी नासेर हा उच्च विद्याविभूषित आहे. त्याने पुण्यातून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी मिळविलेली आहे. परभणीत तो अधूनमधून कंत्राटदारीही करीत होता. परभणीत ग्रँड कॉर्नर भागात त्याच्या वडिलांचे हॉटेल आहे. या हॉटेलवरही तो बसत होता.नासेर औरंगाबाद एटीएसच्या ताब्यात; मुंबईत गुन्हा दाखल तपासाअंती आरोपी नासेरबीन हा इसिसचा समर्थक असल्याचे आणि इसिसचा सीरियातील कमांडर फारुकच्या मदतीने राज्यात मोठा घातपात घडविण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नासेरबरोबरच इसिसचा कमांडर फारुकविरुद्धही मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सध्या नासेर औरंगाबाद एटीएसच्या ताब्यात असून, त्याच्या संपर्कात कोण-कोण होते, याची पोलीस माहिती काढत आहेत.मोठा घातपात घडविण्याची तयारीइसिसने नासेरच्या माध्यमातून राज्यात मोठा घातपात घडविण्याची तयारी सुरू केली होती, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यासाठी नासेरला तयार करण्यात आले होते. विशेष म्हणजे, पवित्र रमजानच्या महिन्यातच घातपात घडविण्याचा डाव रचण्यात आला होता, परंतु काही तयारी पूर्ण न झाल्याने तो मुहूर्त टाळला, असे एटीएसच्या सूत्रांनी सांगितले. इसिसने पाठविले होते बॉम्ब बनविण्याचे ‘डायग्राम’नासेरबीनला सीरियावरून कमांडर फारुकने स्फोट घडविण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी व बॉम्ब कसा बनवायचा, याचे डायग्राम पाठविले होते, तेही ‘एटीएस’ च्या हाती लागले आहेत. नासेरने स्फोट घडविण्यासाठी साहित्याची जुळवाजुळवही सुरू केलेली होती, असे तपासात समोर आले आहे. एटीएसने त्याच्या घरातून मोबाइल, लॅपटॉप संगणक व काही आक्षेपार्ह साहित्य जप्त केले आहे. इसिसमध्ये तरुणांना भरती करण्याच्याही तो प्रयत्नात होता, असे सूत्रांनी सांगितले. राज्यात मोठा घातपात घडवायचा आणि नंतर सीरियाला पळून जाण्याची योजना नासेरने आखली होती. त्यासाठी त्याने आपल्या पासपोर्टचे नुकतेच नूतनीकरणही करून ठेवले होते.
महाराष्ट्रात घातपाताचा इसिसचा डाव उधळला!
By admin | Published: July 15, 2016 3:46 AM