महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर कन्नड रक्षण वेदीकेच्या गुंडांनी महाराष्ट्राच्या बसेस, ट्रक फोडल्याने राज्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. महाराष्ट्राचे मंत्री बेळगावात जाणार होते. तुर्तास ते बाजुला ठेवण्यात आले आहे. असे असताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आपण स्वत: बेळगावमध्ये जाऊ, असा इशारा दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
राज्य सरकारचे सर्व मंत्र्यांना तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षावर बोलविले असून एकेक मंत्री जमू लागले आहेत. यामध्ये बेळगाव सीमा विवादावर सुरु असलेला सर्वोच्च न्यायालयातील खटला, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला इशारा, मंत्र्यांचे बेळगावमध्ये जाणे आदी गोष्टींवर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. याचबरोबर जत, सोलापूरच्या प्रश्नावर देखील निर्णय होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता दिवसेंदिवस चिघळत असल्याचं दिसून येत आहे. बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली. तसंच महाराष्ट्राविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
आव्हाड काय म्हणाले...जर तुम्ही आमच्या बस फोडाल तर आम्ही तुमच्या बस फोडू शकत नाही का? आम्ही हातात बांगड्या घातल्या आहेत असं समजू नका. संपूर्ण कर्नाटकात जर मराठी माणसांचं प्रमाण पाहिलं तर २५ टक्के आहे, १०० टक्के तर इथेच आहेत. बंगळुरुपेक्षा अधिक लोक तर येथे मुंबईत आहेत. आम्ही त्यांना सांभाळून घेतो. आमचा मराठी माणूसच त्यांच्या इडली डोसा खायला जातो. त्यामुळे हे आपलेपण कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना तोडायचे आहे का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला.