कर्नाटक महाराष्ट्र सीमावादावरून दोन्ही राज्यांतील वातावरण पेटले आहे. आज बेळगावच्या सीमेवर महाराष्ट्राचे ट्रक फोडण्यात आले. कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी महाराष्ट्राच्या गाड्यांची नासधुस केली. यावरून महाराष्ट्रातही मोठा वाद निर्माण झाला होता. यावर शरद पवार यांनी आता मीच बेळगावला येईन असा इशारा दिला होता. यानंतर तातडीने महाराष्ट्र सरकारने मंत्र्यांची बैठक बोलावली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी राज्याच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्यात फोनवर चर्चा झाल्याचे सांगितले.
आज जो प्रकार घडला त्यावर एकनाथ शिंदेंनी खेद व्यक्त केला आहे. यावर बोम्मई यांनी सकाळी जो प्रकार झाला त्या लोकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. काही लोकांवर आधीच केली आहे, असे सांगितल्याचे सामंत म्हणाले.
याचबरोबर दोन्हा राज्यातल्या लोकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यासंदर्भात दोन्ही मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाली. दोन्ही राज्यातील जनता सुखाने, समाधानाने राहिली पाहिजे. त्यांना कुठलाही त्रास होऊ नये, असे बोम्मईंना सांगण्यात आले. एवढेच नाही तर दोन्ही मुख्यमंत्री लवकरच यासंदर्भात भेटणार असल्याचे सामंत म्हणाले.