मुंबई - महाराष्ट्राचे राज्यपाल छत्रपतींबाबत अपशब्द वापरतात. भाजपाने धिक्कारही केला नाही. कॅबिनेटने राज्यपालांच्या निषेधाचा प्रस्तावही आणला नाही. तुम्ही काहीही केले म्हणजे तुम्ही बिनकामाचे आहात. छत्रपतींबद्दल काहीही बोलणं महाराष्ट्राने सहन करायचे का? छत्रपतींचा अपमान केल्याबद्दल आम्हाला जेलमध्ये टाकत असाल तर आम्ही जेलमध्ये जायला तयार आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद अचानक उफाळून कसा आला? बोम्मई रोज महाराष्ट्राच्या तोंडावर थुंकतायेत. त्यावर आम्ही आवाज उठवला त्यांना जेलमध्ये जाण्याची धमकी देतायेत. हा महाराष्ट्रद्रोह आहे अशा शब्दात शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांवर घणाघात केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, या देशात आणि महाराष्ट्रात शिवसेनेने कुणालाही भडकवण्याचं काम केले नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमचे मित्र पक्ष यांची हीच भूमिका आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान राज्यपाल करतायेत. भाजपा मंत्री करताये. राष्ट्रीय प्रवक्ते करतायेत त्याबद्दल आम्ही आवाज उठवला म्हणजे आम्ही लोकांना भडकवतायेत असं होत नाही. आम्ही भडकवत आहे असं बोलणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे. कर्नाटकाकडून महाराष्ट्रावर हल्ले होत आहेत त्यावर बोलणं भडकवणं आहे का? भाजपानं महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागायला हवी असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत माझ्यावर हल्ला करण्याची धमकी कन्नड वेदिका संस्था देतेय. तो हल्ला माझ्यावरचा नसून महाराष्ट्रावरचा आहे. तुम्ही बेळगावात जाऊ शकत होता. ते जतमध्ये घुसतायेत, मुंबईत घुसतायेत आणि सरकार गप्प बसून आहे. जी भाषा सरकारचे नेते वापरतायेत तीच कन्नड रक्षक वेदिका वापरतेय असंही राऊतांनी म्हटलं.
भाजपानं काय म्हटलं होतं? संजय राऊत यांनी तुरुंगात शिकलेली षंढ, नामर्द अशी भाषा वापरून चिथावणी देणे आणि आव्हान देणे बंद केले पाहिजे, अन्यथा संयम सुटेल आणि भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरेल असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दिला होता. मुंबईच्या भाजपा प्रदेश कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते.
संजय राऊत यांनी आव्हान देऊ नये, राज्याचे राजकीय वातावरण खराब करू नये आणि सामाजिक वातावरण बिघडवू नये, अन्यथा लोकांचा संयम सुटेल. यातून उद्या उद्रेक झाला तर थांबविता येणार नाही. कोणत्याही नेत्याचा व्यक्तिगत अपमान होईल, असे संजय राऊत यांनी बोलू नये. मर्दानगी काढणे, नालायक म्हणणे हे महाराष्ट्र सहन करणार नाही. राऊत यांनी चिथावणी देणे बंद करावे. नाही तर त्यांच्या बोलण्याचा उलटा परिणाम होईल असं बावनकुळेंनी म्हटलं होतं.