कोल्हापूर/बेळगाव : बेळगावात शिवसेना जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर व ॲम्ब्युलन्सवर कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेला हल्ला, मराठी फलकांना काळे फासण्याचे आंदोलन आणि त्यानंतर कोल्हापुरात एसटीवर झालेली दगडफेक, शिवसैनिकांनी कर्नाटकच्या वाहनांवर ‘जय महाराष्ट्र’ लिहून केलेले आंदोलन, यामुळे सीमावाद पुन्हा उफाळला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा बंद केली आहे. यामुळे प्रवाशांचे शनिवारी हाल झाले. बेळगावात शुक्रवारी कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरोळकर यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यांच्या गाडीच्या मराठी अक्षरातील क्रमांकपट्टीला काळे फासले. शिवसेनेच्या ॲम्ब्युलन्सवरही हल्ल्याचा प्रयत्न झाला. यावेळी कर्नाटक पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. यानंतर, बेळगाव-कोल्हापूर मार्गावरील काकती येथील गावाजवळचे काही मराठी फलकही कन्नड कार्यकर्त्यांनी फोडले. कन्नड कार्यकर्त्यांच्या गुंडगिरीनंतर शिवसैनिक व मराठी भाषिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. बेळगावचे पोलीस आयुक्त डॉ. विक्रम आमटे यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या तणावाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसरात शनिवारी सकाळी फलाटावर लावलेल्या कोल्हापूर-स्वारगेट-पुणे या बसवर कर्नाटकातील एकाने दगडफेक केली. याप्रकरणी एकनाथ सोमाण्णा हलगीकर यास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेनंतर कर्नाटकात जाणाऱ्या एसटी गाड्या बंद करण्याचा निर्णय एस.टी. महामंडळाने घेतला. शिवसैनिकांनी कर्नाटकच्या वाहनांवर ‘जय महाराष्ट्र’ लिहिलेकोल्हापूर शिवसेनेने शनिवारी कागल येथील तपासणीनाक्यावर कर्नाटक राज्यातून येणाऱ्या वाहनांवर जय महाराष्ट्र असे फलक चिकटवले. तसेच या नाक्यावरून कर्नाटक पासिंगची वाहने सोडू नयेत, त्यांना परत कर्नाटकात पाठवावे, असे निवेदनही कोल्हापूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डाॅ. स्टिव्हन अल्वारीस यांना दिले. तोपर्यंत बससेवा बंदआंदोलनावेळी दोन्ही राज्यांच्या बसला आंदोलक टार्गेट करून त्या फोडतात. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर आगाराने जोपर्यंत वाद निवळत नाही, तोपर्यंत कर्नाटकात बससेवा सुरू करायची नाही, असा निर्णय घेतला आहे.
‘प्रकाश शिरोळकर यांना संरक्षण द्या’ शिरोळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याची शिवसेनेने गंभीर दखल घेतली आहे. शिरोळकर यांना केंद्रीय पथकामार्फत संरक्षण द्यावे, अशी मागणी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
डोकी फुटली तर रडत दिल्लीला जाऊ नका - संजय राऊतबेळगावात मराठी लोकांवर जो अत्याचार होत आहे, त्याची दखल कुणी घेत नसेल, तर महाराष्ट्र सरकारला सर्व ताकदीनिशी बेळगावात उतरावं लागेल. डोकी फुटली तर दिल्लीला रडत जाऊ नका, अशी प्रतिक्रिया खा. संजय राऊत यांनी दिली आहे.