दुहेरी पटाला हात घालत चितपट डाव टाकून मंगळवेढ्याच्या महेंद्र गायकवाडला अस्मान दाखवत पुण्याचा पठ्ठ्या शिवराज राक्षे याने ‘महाराष्ट्र केसरी’वर आपली मोहोर उमटवली. हजारो कुस्तीशौकिनांच्या साक्षीने राक्षे याने मानाची गदा उंचावली आणि मैदानावर एकच जल्लोष झाला. मात्र महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील माती गटातील अंतिम लढतीबाबतचा वाद सुरू आहे. पैलवान सिकंदर शेख याच्यावर अन्याय झाल्याच्या भावना सोशल मीडियावरून व्यक्त केल्या जात आहेत. या प्रकरणी आता सिकंदर शेख याच्या मोहोळ गावचे माजी नगराध्यक्ष रमेश बारस्कर यांनी गंभीर आरोप केला.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पैलवान सिकंदर शेख विरोधात चार गुण दिल्याचा आरोप पंच मारूती सातव यांच्यावर होत आहे. पैलवान सिकंदर शेख याने देखील आपल्यावर अन्याय झाल्याचे शल्य बोलून दाखवले आहे. त्यानंतर आता रमेश बारस्कर यांनी सिकंदवर अन्याय झाला असून पुण्यात स्पर्धा भरली की, पुण्यातीलच पैलवान विजयी केले जातात?, असा प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान, रमेश बारसकर हे मोहोळचे माजी नगराध्यक्ष आहेत. शिवाय ते स्वत: देखील पैलवान होते. ते सिकंदरच्या कुस्तीला आणि खुराकीसाठी आर्थिक मदत करतात.
पुण्यातील मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत 65वी महाराष्ट्र केसही स्पर्धा पार पडली. उपांत्य लढतीत माती विभागातून महेंद्र गायकवाडने अंतिम सामन्यात धडक मारली, तर गादी विभागातून शिवराज राक्षे अंतिम सामन्यात आला. यानंतर या दोन्ही मल्लांमध्ये गादीवर अंतिम सामना पार पडला. दोन्ही पैलवान तुलनेने सारखेच असल्यामुळे सामना खूप वेळ चालेल अशी सर्वांना अपेक्षा होती. पण, अनुभवी शिवराज राक्षेने महेंद्रला चितपट करत अवघ्या काही मिनिटात महाराष्ट्र केसरीचा किताब आपल्या नावे केला.
दरम्यान, आम्ही सिकंदरला हमाली करून मोठं केलं. दिवसरात्र काबाडकष्ट करून पैलवान केलं. सिकंदरनेही जोराचा सराव केला. वडिल आणि त्याच्या मेहनतीला बळ देणाऱ्या सर्वांच्या अपेक्षापूर्तीवर तो खरा ठरला. देशात नामांकित पैलवान म्हणून तो नावारुपाला आला, महाराष्ट्र केसरी स्पर्धेतही अंतिम फेरी गाठत त्याने जिंकून दाखवलं. मात्र, अंतिम सामन्यात पराभव झाल्याने सिकंदरच्या चाहत्यांची मोठी निराशा झाली. पण, या पराभवानंतर पंचाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभे राहिले. दरम्यान, सिंकदरच्या आई-वडिलांनीही नाराजी व्यक्त केली असून खर्चाची जबाबदारी उचलणारे उद्योजक रमेश बारस्कर हेसुद्धा रविवारी दिवसभर त्याच्याच घरी होते.
गरिबांना वाली कोण राहणार?
जर अन्याय होत असेल तर गरीबांना कोण वाली राहणार. त्याला जाणीवपूर्वक कमी गुण देण्यात आले आहेत. आमच्या मुलावर जो अन्याय झाला, तो इतर पैलवानांवर अन्याय होऊ नये असे सिकंदरच्या वडिलांनी म्हटले. ज्यांनी हा निर्णय दिला त्यांनी स्वत:च्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवत सांगावे की, तो निर्णय योग्य आहे, अशी अपेक्षाही रशीद खान यांनी बोलून दाखवली.
पंचांना धमकीचा फोन-
पंचांच्या निर्णयावर कुस्तीविश्वात आणि सोशल मीडियातून प्रश्नचिन्ह उभा होत आहे. आता, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतीला हा वाद पोलिसांत पोहोचला आहे. याप्रकरणी, स्पर्धेतील पंचांना फोन करुन धमकी दिल्यासंदर्भात कुस्ती नियोजन समितीचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी पोलीस अधीक्षक हेमंत पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे,
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"