उमेश जाधव -पुणे : माती विभागातून महेंद्र गायकवाड व सिकंदर शेख, तर गादी विभागातून हर्षवर्धन सदगीर व शिवराज राक्षे यांनी दमदार कामगिरी करताना महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत दोन्ही गटातील मल्ल एकमेकांशी लढून ‘महाराष्ट्र केसरी’ किताबासाठी दावेदारी दाखल करणार आहेत. माजी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर ‘डबल महाराष्ट्र केसरी’साठी प्रयत्नशील असणार आहे.स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीच्या मान्यतेने ६५व्या राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धा सुरू आहे. माती विभागातील उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने कोल्हापूरच्या शुभम शिदनाळेला पराभूत करताना स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. मैदानात उतरल्यानंतर दोन्ही मल्लांनी एकमेकांना केवळ दहा सेकंदच आजमावले. त्यानंतर महेंद्र गायकवाडने थेट एक टांग डाव टाकला अन् शुभमचा तोल गेला आणि मिळालेल्या संधीचा फायदा करून घेताना महेंद्र गायकवाडने शुभमला थेट चीतपट करताना अंतिम फेरीत प्रवेश केला.दुसऱ्या उपांत्य फेरीत वाशिमच्या सिकंदर शेखने बुलढाण्याच्या बालारफिक शेखला केवळ ३० सेकंदात चीतपट करताना माती विभागातून महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम लढतीत प्रवेश केला. सिकंदर शेखने बालारफिक शेखवर पहिल्या १५ सेकंदात ताबा मिळविताना २ गुणांची कमाई केली. त्यानंतर आक्रमण अधिक धारधार करताना सिकंदरने बालारफिकवर भारंदाज डाव टाकताना कुस्ती धोकादायक स्थितीमध्ये नेऊन बलाराफिकला दाबत चीतपट करताना मैदान मारले.गादी विभागातून नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने पुणे जिल्ह्याच्या तुषार डुबेला ५-० असे पराभूत करताना अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या लढतीत नांदेडच्या शिवराज राक्षेने हिंगोलीच्या गणेश जगतापला ११-१ असे पराभूत करताना गादी विभागातून अंतिम फेरीत प्रवेश केला.
तत्पूर्वी, माती विभागाच्या उपांत्यपूर्व फेरीत माजी ‘उपमहाराष्ट्र केसरी’ लातूरच्या शैलेश शेळकेला सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने ५-२ असे पराभूत केले. कोल्हापूरच्या शुभम शिदनाळेने सांगलीच्या संदीप मोटेला ४-० असे पराभूत केले. वाशिमच्या सिकंदर शेखने मुंबईच्या विशाल बनकरला १०-० असे पराभूत करत उपांत्य फेरी गाठली.
जालन्याचा माजी महाराष्ट्र केसरी बालारफिक शेखने कोल्हापूरच्या अरुण बोंगार्डेला ७-० असे पराभूत करताना उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.
गादी विभागातून नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने वाशिमच्या वैभव मानेला ५-० असे पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. याच विभागातून पुण्याच्या तुषार डुबेने सोलापूरच्या अक्षय मंगवडेला २-० असे पराभूत केले. तिसऱ्या लढतीत हिंगोलीच्या गणेश जगतापने सांगलीच्या सुबोध पाटीलला ५-० असे पराभूत करताना उपांत्य फेरी गाठली. चौथ्या लढतीत शिवराज राक्षेने माउली कोकाटेला १०-० असे एकतर्फी पराभूत करताना महाराष्ट्र केसरी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.