ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - महाराष्ट्र केसरी मल्ल विजय चौधरी याला राज्य सरकारकडून पोलीस दलात नोकरी देण्यात आली आहे. अखेरी सरकारने आपले आश्वासन पूर्ण केले आहे. डीवायएसपी या पदावर विजय चौधरीची नियुक्ती करण्यात आली आहे.
सलग तीनवेळा मानाचा "महाराष्ट्र केसरी" किताब पटकावणा-या विजय चौधरीला नोकरी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली होती. नोकरी देण्यासंबंधीचे नियम तयार करायचे असल्यामुळे विजय चौधरीला नोकरी देण्यात विलंब झाल्याचा खुलासा यावेळी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केला होता.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०१६ च्या विजेत्यास थेट पोलीस दलात घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र काही कारणास्तव त्यांच्या नोकरी देण्याच्या प्रक्रियेत विलंब झाला होता. यावर विजय चौधरी यांनी खंतही व्यक्त केली होती.
दरम्यान, 10 डिसेंबर 2016 रोजी जळगावचा विजय चौधरी याने सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला होता. त्याने पुण्याच्या अभिजित कटकेला पराभवाची धूळ चारली होती. अभिजितने स्पर्धेत परतण्याचा प्रयत्न केला पण विजयने त्याला संधीच दिली नाही व महाराष्ट्र केसरी किताबावर तिस-यांदा आपले नाव कोरले.