- पराग कुंकूलोळ चिंचवड : राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रात २३० हून अधिक नेत्रपेढ्या कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून नेत्रसंकलनाचे कार्य केले जाते. समाजात नेत्रदानाविषयी जनजागृती करून नेत्रसंकलन करण्यासाठी अनेक उपाययोजना राबविल्या जातात. या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांमुळे राज्यात २०१८ ते २०१९ या वर्षात ८ हजार नेत्रसंकलनाचा टप्पा गाठला आहे़. मात्र, मृत्यूचे प्रमाण व या मृत्यूपश्चात होणारे नेत्रदान यात मोठी तफावत दिसून आली आहे. त्यामुळे नेत्रदानाची जनजागृती मोठ्या प्रमाणावर होत असली तरी नेत्रदानाची मानसिकता मात्र रूजत नसल्याची खंत नेत्रदानासंबंधी काम करणाऱ्या संस्थांचालकांकडून व्यक्त होत आहे. अंध व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश देणारे डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा होणारा दृष्टिदान दिवस १० जूनला आहे. हा दिवस जागतिक दृष्टिदान दिन म्हणून साजरा केला जात असताना, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात नेत्रदानाचे प्रमाण अधिक असले तरी नेत्रदानाविषयी कमालीची उदासीनता जाणवत आहे. आयुष्यात ज्यांच्या वाट्याला अंधत्व आले, त्यांना अंधत्वावर मात करून अंधारातून प्रकाशाचा मार्ग शोधण्याची प्रेरणा दिली. शासकीय सेवेत नेत्रचिकित्सक म्हणून अहोरात्र झटणाऱ्या डॉ. भालचंद्र यांचे कार्य अजरामर झाले आहे. त्यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यात १० जून १९२४ रोजी झाला. खडतर परिस्थिवर मात करत त्यांनी चिकाटीच्या बळावर ऐंशी हजाराहून अधिक नेत्रचिकित्सा पूर्ण केल्या.अंधांचे जीवन प्रकाशमय करणाऱ्या या दीपस्तंभाची ज्योत १० जूनला १९७९ ला मालवली. त्या दिवसाचे औचित्य म्हणून १९८२ पासून दहा जून हा ‘दृष्टिदान’ दिवस म्हणून साजरा होतो. समाजात नेत्रदानाबाबत असणारे गैरसमज दूर करण्यासाठी महाराष्ट्र अंधत्व नियंत्रण कार्यक्रम राबविले जातात. याचबरोबर अनेक सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, नेत्रदान जनजागृती अभियान राबवित आहेत. या बाबत शासनाकडून प्रभावशाली यंत्रणा उभी राहणे महत्त्वाचे आहे. इतर राज्यांच्या तुलनेत नेत्रसंकलनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. मात्र व्यापक दृष्टिकोनातून समाजातील सेवाभावी संस्था, सार्वजनिक मंडळे, महिला बचतगट, ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या माध्यमातून नेत्रदानाविषयी जनजागृती केल्यास याबाबतीत असणारे गैरसमज दूर होऊन नेत्र संकलनाचे प्रमाण वाढू शकते. असे मत या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींकडून व्यक्त होत आहे. नेत्रदान प्रक्रिया अत्यंत सुलभ असल्याने याबाबत समाज प्रबोधन होणे महत्त्वाचे आहे.
राज्यातील आकडेवारी
वर्ष नेत्रदान२०१५-१६ ७३०१२०१६-१७ ७४५२२०१७-१८ ७५६०२०१८-१९ ८२८०
दृष्टिदान दिवसाची जगात नोंद नाही
स्विर्त्झलंडमधील जीनिव्हा शहरात असणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेशी व इतर राज्यातील तज्ज्ञांशी ह्यलोकमतह्ण प्रतिनिधीने संपर्क साधला असता १० जून या दिवसाची जागतिक दृष्टिदान दिवस म्हणून कोठेही नोंद नसल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्राची पार्श्वभूमी असणाऱ्या या दिवसाला जागतिक दिवस ही नोंद मिळणे आनंदाची बाब आहे. ..............डॉ. भालचंद्र यांचा विसर महाराष्ट्राला पडावा ही खरी शोकांतिका आहे. त्यांच्या स्मृतीला उजाळा देणारा हा दिवस आहे. त्यांचे नेत्रदानाबाबत असलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी या दिवशी जनजागृती अभियान सर्वत्र घेतले जावे, असे मत व्यक्त होत आहे. सध्या राज्यातील बहुतांशी नेत्रपेढीचे कार्य ऑनलाइन पद्धतीत सुरू झाले आहे. नेत्रदान प्रक्रियेनंतर मिळणारे बुबुळ योग्य रुग्णाला उपयोगी यावे या साठी ही प्रक्रिया उत्तम ठरत आहे..............डॉ. भालचंद्र यांनी आपले आयुष्य अंधव्यक्तींना प्रकाश देण्यासाठी घालविले. मराठवाडा भागातील अनेक दृष्टिहीन व्यक्तींवर नेत्रचिकित्सा करून त्यांचे आयुष्य प्रकाशमय केले. मात्र नेत्रदान जनजागृतीबाबत या भागात आजही उदासिनता आहे़ हे दुर्दैव आहे. या भागात एक आधुनिक नेत्रपेढी सुरू व्हावी व डॉ. भालचंद्र यांची प्रेरणा घेऊन सामाजिक संस्थेने यासाठी कार्य करावे ही खरी गरज आहे.-डॉ. मदन देशपांडे, नेत्रतज्ज्ञ...........