- मनीषा म्हात्रे, मुंबईएकेकाळी स्त्री भ्रूणहत्येने राज्य हादरले असताना त्यापाठोपाठ आता, चिमुरडींच्या हत्येच्या घटनांमध्ये राज्य आघाडीवर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे मुली वाचवा, अशी म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आंतरराष्ट्रीय कन्या दिन देशभरात उद्या (रविवारी) साजरा होत असताना त्यांच्या सुरक्षेबाबत शासनस्तरावर गांभीर्याने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालेली आहे. ‘मुलगी नको, वंशाचा दिवा हवा, म्हणून मुलींची गर्भाशयातच हत्या केली जात होती. यामुळे दरहजारी मुलींच्या प्रमाणात दिवसेंदिवस घट होत असताना, शासनाने यावर कडक भूमिका घेतल्याने त्यावर काही प्रमाणात रोख आणणे शक्य झाले आहे. मात्र त्यातच आता सहा वर्षांखालील चिमुकल्यांच्या हत्येच्या गुन्ह्यात राज्य आघाडीवर असल्याने मुलगी वाचविण्यासाठी पुन्हा एकदा पुढे येण्याची गरज भासत आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने जारी केलेल्या गेल्या वर्षाच्या आकडेवारीनुसार, ६ वर्षांखालील मुलींच्या सर्वाधिक हत्या ६२ महाराष्ट्रात झाल्या आहेत. या चिमुरडींच्या हत्येमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल तामिळनाडू (३४), उत्तर प्रदेश (२७), मध्य प्रदेश (२६) यांचा क्रमांक आहे. अल्पवयीन मुलींवरील अत्याचार कमी करण्यासाठी आणि आरोपींना जरब बसवून जास्तीत जास्त शिक्षा देण्यासाठी देशामध्ये ‘पॉस्को’ कायदा करण्यात आला. तसेच अल्पवयीन मुले हरवल्यास अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेशसुद्धा न्यायालयाने दिले. असे असले तरी अल्पवयीन मुलींच्या अत्याचारांमध्ये घट न होता अत्याचारांंचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. देशाची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये अल्पवयीन मुलींचे अपहरण, लंैगिक अत्याचार असे दर दिवसाला किमान तीन ते चार गुन्हे दाखल होतात. या वर्षीच्या ४ आक्टोबरपर्यंत ३२२ मुली लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरल्या आहेत.कायद्याची अंमलबजावणी होणे गरजेचेमुलींच्या अत्याचारांच्या घटनांवर रोख आणण्यासाठी शासनाने कायद्यामध्ये कठोरता आणली आहे. मात्र याची अंमलबजावणी योग्य रीतीने होत नसल्याने मुलींच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशात समाजाने यासाठी पुढाकार घेऊन मुलगा, मुलगी यातील भेदाबाबत असलेली वृत्ती बदलणे गरजेचे आहे. याची सुरुवात प्रत्येक कुटुंबीयांनी त्यांच्या स्वत:पासून करणे गरजेचे आहे.- कुमार निलेंदु, क्राय संस्थामुलीची हत्या ही गंभीर बाब : अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेबाबत पोलिसांची जितकी जबाबदारी आहे तितकीच ती त्यांच्या कुटुंबीयांचीदेखील आहे. इतर देशांतील पालक आपल्या लहान मुलांना कधी एकटे घरात सोडत नाहीत. त्यांच्या प्रत्येक हालचालींवर त्यांचे लक्ष असते. त्यात अल्पवयीन मुलींच्या हत्येतील वाढ ही गंभीर बाब असून याबाबत ठोस पावले उचलण्यात येतील, असे आश्वासन राज्याचे नवनिर्वाचित पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी ’लोकमत’शी बोलताना दिले आहे. प्रत्येक पाल्य हा त्यांच्या कुटुंबीयांची खरी मालमत्ता आहे विशेषत: म्हणजे मुलगी. यासाठी सर्वांनी पुढे येऊन याबाबत पुढे येणे गरजेचे असल्याचे आवाहनही त्यांनी केले.
अल्पवयीन मुलींच्या हत्येत महाराष्ट्र देशात आघाडीवर
By admin | Published: October 11, 2015 4:11 AM