मुंबई : विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली आहे. या दोन्ही नेत्यांनी विधिमंडळात आपले उमेदवारी अर्ज सादर केले. तर ऐनवेळी भाजपच्या पाठिंब्याने सदाभाऊ खोत यांनीही अर्ज दाखल केला.
विधान परिषदेच्या दहा जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस होता. राष्ट्रवादीकडून शिवाजीराव गर्जे यांचा एक अतिरिक्त अर्जही सादर करण्यात आला. याशिवाय, काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे या नेत्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपच्या उमा खापरे यांनी अर्ज दाखल केला.
सदाभाऊ खोत यांना भाजपने उमेदवारी नाकारली होती. मात्र, त्यांनी भाजपच्या पाठिंब्याने अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. सदाभाऊ खोत यांना पाठिंबा देत मैदानात उतरवल्याने भाजपकडून एकूण ६ अर्ज सादर झाले आहेत. तर, शिवसेना व काँग्रेसचे प्रत्येकी दोन उमेदवार आहेत. राष्ट्रवादीकडून एकूण तीन अर्ज आले आहेत. दहा जागांसाठी १३ उमेदवार रिंगणात आहेत.
उमेदवारीचा निर्णय एकमताने : जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसने अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी रामराजे आणि खडसे यांच्या नावांची घोषणा केल्याने पक्षात नाराजी असल्याचे वृत्त होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र या वृत्ताचे खंडन केले.
- ‘खडसे इतिहासजमा झाले आहेत म्हणणाऱ्यांना उत्तरे मिळाली’, अशा शब्दात खडसे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.