मुंबई - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आटोपल्यानंतर आता राज्यात विधान परिषद निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळवणाऱ्या काँग्रेसने विधान परिषद निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला असून, कोकण पदवीधर मतदारसंघामधून काँग्रेसने रमेश कीर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये अत्यंत अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे.
विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघात रमेश श्रीधर कीर यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. दरम्यान, कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये मनसेने अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर भाजपाने येथून विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनां उमेदवारी दिली आहे. तर शिवसेना शिंदे गटाने कोकण पदवीधर मतदारसंघातून संजय मोरे यांना उमेदवारी दिली आहे.
तर यापूर्वी भाजपने मुंबई पदवीधर साठी किरण शेलार,मुंबई शिक्षक साठी शिवनाथ दराडे आणि कोकण पदवीधर साठी विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांची उमेदवारी जाहिर केली आहे. तर उद्धव सेनेने पदवीधर साठी माजी मंत्री डॉ.अनिल परब,शिक्षक मधून ज.मो.अभ्यंकर यांची जाहीर केली आहे.