मुंबई : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या हळूहळू कमी होताना दिसत आहे. काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होत आहे, तर काही ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही वाढताना दिसत आहे. कोरोनावर मात करण्यासासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या 'ब्रेक द चेन' (Break The Chain) उपक्रमांतर्गत लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. 15 जूनपर्यंत लॉकडाऊन (Lockdown) वाढविण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर 'लोकमत'चे संपादकीय संचालक आणि सह व्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी ट्विटरच्या माध्यमातून लॉकडाऊन वाढविणे योग्य आहे का? असा एक पोल घेतला. तसेच, या पोलला तीन पर्याय दिले. यामध्ये 1) होय, कोरोना लवकर संपेल. 2) नाही, राज्याचे मोठे नुकसान होईल. 3) आम्हाला आता याची सवय झालीय, असे पर्याय देण्यात आले. दरम्यान, या पोलवर 3 हजार 533 जणांनी आपले मत नोंदविले आहे. यामध्ये 'होय, कोरोना लवकर संपेल', या पर्यायाला सर्वाधिक म्हणजेच 42 टक्के मतं मिळाली आहेत. तर 'नाही, राज्याचे मोठे नुकसान होईल', असे 30 टक्के लोकांचे म्हणणे आहे आणि 'आम्हाला आता याची सवय झालीय', यावर 28 टक्के लोकांनी आपले मत नोंदविले आहे.
दरम्यान, 'ब्रेक द चेन' उपक्रमांतर्गत आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटिव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार 15 जूनच्या सकाळी 7 पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. त्यानुसार लॉकडाऊन संदर्भातील अधिकृत आदेश काही जिल्ह्यांनी जारी केले आहेत. मुंबईसह पुण्यात लॉकडाऊनच्या नियमात काही सवलती देण्यात आल्या आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकांनाची वेळ 2 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे.