मुंबई – राज्यात कोरोनावर CoronaVirus नियंत्रण मिळवण्यासाठी गेल्या महिनाभरापासून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढत होती त्याला आळा घालण्यासाठी ठाकरे सरकारनं सुरुवातीला ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले. त्यानंतर हे निर्बंध १५ मे पर्यंत वाढवण्यात आले होते. सध्या राज्यातील कोरोना रुग्णसंख्येतील वाढ स्थिरावली असली तरी कडक निर्बंध हटवून राज्य सरकार कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. Maharashtra Lockdown: Lockdown-like restrictions extended till June 1
बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळात राज्यातील कडक निर्बंध पुढे वाढवण्यावर एकमत झाले. त्यानंतर आता ब्रेक द चेन अंतर्गत ठाकरे सरकारने राज्यातील कडक निर्बंध १ जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता १ जून २०२१ सकाळी ७ वाजेपर्यंत हे निर्बंध लागू असतील.
सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात काय म्हटलंय?
Ø कोणत्याही वाहनातून महाराष्ट्र राज्यामध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल असणे अनिवार्य आहे. हा अहवाल राज्यामध्ये प्रवेश करण्याच्या जास्तीत जास्त ४८ तास अगोदर केलेल्या चाचणीचा असावा.
Ø यापूर्वी १८ एप्रिल आणि १ मे २०२१ रोजी जाहीर केलेल्या निर्बंधांमध्ये महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या संवेदशील भागातील व्यक्तींसाठी असलेले नियम आता देशाच्या कोणत्याही भागातून महाराष्ट्रामध्ये दाखल होणाऱ्या व्यक्तींसाठी लागू राहतील.
Ø मालवाहतूक करणाऱ्यांकरिता एका वाहनांमध्ये फक्त दोन व्यक्ती (चालक आणि क्लिनर/हेल्पर) यांना प्रवास करण्याची मुभा असेल. जर हे मालवाहक महाराष्ट्रच्या बाहेरून येत असतील तर त्यातील दोघांना RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल द्यावा लागेल आणि हा अहवाल राज्यात दाखल होण्याच्या जास्तीत जास्त ४८ तासापूर्वीचा असावा. हा अहवाल सात दिवसांकरिता वैध राहील.
Ø स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन (डीएमए) हे ग्रामीण बाजारपेठ आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कामावर सनियंत्रण ठेवतील आणि कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन केले जात आहे की नाही यावर लक्ष ठेवतील. जर ‘डीएमए’ला असे आढळले की, अशा काही ठिकाणी व्यवस्था करणे व शिस्तीचे पालन होत नाहीये, तर त्या त्या ठिकाणच्या ग्रामीण बाजारपेठा आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज बंद करण्याच्या निर्णय किंवा अधिक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला जाईल.
Ø दुध संकलन, दुधाची वाहतूक आणि प्रक्रिया हे सर्व कोणत्याही निर्बंधांशिवाय चालू ठेवता येईल, परंतु लागू असलेल्या सर्व निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करून आवश्यक वस्तू विक्रीसाठीची परवानगी असलेल्या दुकानांसाठी किरकोळ दुध विक्रीला मुभा असेल किंवा ते ‘होम डिलिव्हरी’ करू शकतील.
Ø कोविड-१९ व्यवस्थापनाच्या कामासाठी औषधी आणि इतर साहित्यांची मालवाहतूक करण्याच्या कामात सहभागी असलेले विमानतळ आणि बंदर सेवेतील लोकांना लोकल, मोनो आणि मेट्रो रेल्वेने प्रवास करण्याची मुभा असेल.
Ø स्थानिक डीएमए आपल्या अखत्यारीतील विशेष भागांमध्ये अधिक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेऊ शकतात. परंतु याची कल्पना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला (‘एसडीएमए’) द्यावी लागेल आणि हे निर्बंध लागू करण्याच्या ४८ तास अगोदर त्याची जाहीर घोषणा करावी लागेल.
महाराष्ट्रातील सध्याची स्थिती
राज्यात बुधवारी ४६ हजार ७८१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ८१६ रुग्णांची नोंद झाली आहे. ५८ हजार ८०५ रुग्ण बरे होऊन घरी परतल्याचं दिलासादायक चित्र समोर आलं आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ४६ लाख १९६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८८.०१% एवढे झाले आहे. राज्यात आज ८१६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे .सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ०१ लाख ९५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५२ लाख २६ हजार ७१० (१७.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३६ लाख १३ हजार व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९ हजार ४१७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या एकूण ५ लाख ४६ हजार १२९ रुग्ण आहेत