मुंबई : कडक निर्बंधाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई पोलिसांकड़ून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात, ठिकठिकाणी कायमस्वरूपी नाकाबंदी करत तंबू उभारण्यात आले आहेत. अशात, मुंबई पोलिसांच्या दिमतीला गृहरक्षक दल, राज्य राखीव पोलीस बल आणि सशस्त्र विभागातील अधिकारी, अंमलदारांचा अतिरिक्त फौजफाटा देण्यात आला आहे.
बुधवारी रात्री ८ नंतर पोलिसांकडून खासगी वाहनांची झाडाझडती सुरू करण्यात येणार आहे. अशात, ज्याठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन होण्याचे प्रमाण जास्त आहे, अशी ठिकाणे निवडून त्या ठिकाणी ३० एप्रिलपर्यंत कायमस्वरूपी बेरिकेट्स लावण्यात आले आहेत. त्याच जोडीला ठिकठिकाणी तंबू उभारण्यात आले आहेत. तसेच नागरिकांना आवाहन करण्यासाठी मेगाफोन, वाहने, तात्पुरते निवारे, पाणी, अन्न आदी व्यवस्थाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अशात, टोल नाक्यावर जास्तीचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे टोलनाक्यावरील वाहनांवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. याशिवाय गेल्यावर्षी कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या धारावी, वरळी, कुरार, भांडूप आदी उपनगरांसह दाट वस्ती असलेल्या भागांमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.पोलीस कर्मचार्यांसाठी कोविड हेल्पडेस्क क्षेत्रीय स्तरावरही सुरू करण्यात आले आहे तसेच यावेळी पोलिसांनी काय करावे, काय करू नये याबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. अशात, मुंबई पोलिसांच्या दिमतीला गृहरक्षक दल, राज्य राखीव पोलीस बलाच्या पाच तुकड्या व सशस्त्र विभागातील १३७५ अधिकारी, अंमलदारांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात आहे.
आठपूर्वी घरी जाण्याची धडपडयात, पोलिसांचा बंदोबस्त पाहता रात्री ८ पूर्वी घरी जाण्यासाठी नागरिकांची धडपड दिसून आली.
अफवावर सायबर पोलिसांचा वॉचया काळात अफवा पसरू नये म्हणून सायबर पोलीस सोशल हालचालीवर लक्ष ठेवून आहेत तसेच कोणीही अफवा पसरवू नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
मुंबईकरांचे सहकार्य महत्त्वाचेलॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी मुंबईकरांचे सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी घरी राहून या कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मदत करावी, असे आवाहन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केले आहे.
नियमांचे पालन करा - पोलीस महासंचालक कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात राज्यातील नागरिकांनी आवश्यकतेशिवाय घराबाहेर पडू नये, नियमांचे पालन करून प्रशासन व पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी बुधवारी केले. संचारबंदीच्या या काळात दोन लाखांहून अधिक पोलीस दोन शिफ्टमध्ये कार्यरत असतील. त्यांच्या मदतीला सुमारे १४ हजार होमगार्ड आणि राज्य राखीव दलाच्या २० तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच काेरोना रुग्णांना सहाय्य करण्यासाठी पोलिसांना सूचना करण्यात आल्या आहेत.
अत्यावश्यक सेवेसाठी खासगी वाहनांना मुभा- लॉकडाऊनच्या काळात राज्यातील नागरिकांनी अत्यावश्यक सेवेसाठी आंतरजिल्हा प्रवासासाठी खासगी वाहनाचा वापर करता येणार आहे. - त्यासाठी कसल्याही पासची आवश्यकता असणार नाही. ते आवश्यक ठिकाणी प्रवास करू शकतील, असे संजय पांडे यांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी काही अडचणी आल्यास स्थानिक पोलीस आणि नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.- मुंबईतील पाच हजार सीसीटीव्हीद्वारे पोलीस नियंत्रण कक्षातून सर्व हालचालींवर लक्ष ठेवले जाईल. तसेच गरज पडल्यास ड्रोनचादेखील वापर करण्यात येणार आहे.